महाविकास आघाडीची बल्ले बल्ले : अजून तीन उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचे संकेत !

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज दाखलच न झाल्याने शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे एक असे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर यानंतर छाननीत अर्ज अवैध ठरल्याने राष्ट्रवादीचे अजून तीन उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार दिनांक १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत होती. तीन वाजेपर्यंत धरणगाव प्राथमिक सहकारी सोसायटी मतदारसंघातून फक्त संजय मुरलीधर पवार यांचाच अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली. तर, याच प्रमाणे पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील तर एरंडोलमधून त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांची देखील बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. याबाबत अधिकृत घोषणा नंतर करण्यात येणार असली तरी महाविकास आघाडीच्या तीन जागा बिनविरोध आल्याने भाजपला धक्का बसला होता.

दरम्यान, यानंतर बुधवार दिनांक २० रोजी छाननी करण्यात आली. यात अनेक उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते. यात काही ठिकाणच्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. यात अमळनेरमधून माजी आमदार स्मिता वाघ यांचा अर्ज बाद करण्यात आला. याच प्रमाणे मुक्ताईनगर आणि बोदवड येथील उमेदवारांचे अर्ज देखील बाद झाले. यामुळे सोसायटी मतदारसंघातून अमळनेर येथून आमदार अनिल भाईदास पाटील तर बोदवडमधून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. मुक्ताईनगरात फक्त एकनाथराव खडसे आणि त्यांची कन्या रोहिणीताई खडसे यांचेच अर्ज आहेत. यात रोहिणी खडसे अर्ज मागे घेऊन त्या महिला वर्गवारीतून निवडणूक लढविणार आहेत. यामुळे नाथाभाऊंचा विजय देखील निश्‍चीत झाला आहे.

या बाबींचा विचार केला असता, सोसायटी मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या सहा उमेदवारांचा विजय निश्‍चीत झाला असून यात धरणगाव-संजय पवार, एरंडोल-अमोल पाटील, पारोळा-चिमणराव पाटील यांच्यानंतर आता मुक्ताईनगर-एकनाथराव खडसे, बोदवड रवींद्र भैय्या पाटील आणि अमळनेर आ. अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे. याबाबत नंतर अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

दरम्यान, भुसावळ सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार संतोष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला असून तेथून नगराध्यक्ष रमण भोळे हे आमदार संजय सावकारे यांच्या विरोधात रिंगणात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content