जनतेचे पाठबळ हीच आमची ऊर्जा : आ. गुलाबराव पाटील

धरणगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मतदारसंघात परत आल्यानंतर जनतेने ज्या प्रकारे भेटून पाठींबा दिलाय ते पाहून मन भरून आले आहे. मी केलेल्या कामाची हीच खरी पावती आहे. जनतेचे पाठबळ हीच खरी उर्जा असून या माध्यमातून अजून जनसेवा करण्याचे बळ मिळाले असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील भोद बुद्रुक येथील ३३/११ केव्हीए क्षमतेच्या वीज उपकेंद्राच्या क्षमतावाढ कामाच्या अंतर्गत नवीन रोहित्र आणि नवीन वीज वाहिनीच्या कामांचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते.

या कामामुळे सदर उपकेंद्रावर पडणारा लोड हा सहजपणे विभाजीत होणार असून याचा परिसरातील शेतकर्‍यांसह ग्रामस्थांना लाभ होणार आहे. या माध्यमातून मतदारसंघात परतल्यानंतर आ. गुलाबराव पाटील हे लागलीच ऍक्शन मोडवरून कामाला लागल्याचे दिसून आले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अतिशय नाट्यमय घडामोडी झाल्या. यात सत्तांतर झाल्यानंतर माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील हे परवा सायंकाळी आपल्या मतदारसंघात परतले. दोन दिवसात त्यांच्या भेटीला हजारो आबालवृध्द येऊन त्यांनी पाठींबा दर्शविला. तर स्वत: आ. गुलाबभाऊ पाटील यांनी ऍक्शन मोडवर येत पूर्ववत कामे सुरू केलीत. यात आज धरणगाव तालुक्यातील भोद बुद्रुक येथील ३३/११ केव्हीए क्षमतेच्या उपकेंद्रात क्षमतीकरणातील वाढीच्या अंतर्गत नवीन रोहित्र आणि वीज वाहिन्यांच्या कामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य गोपालबापू चौधरी, अधिक्षक अभियंता फारूक शेख, कार्यकारी अभियंता रमेश पवार, उपकार्यकारी अभियंत सुनील रेवतकर आणि श्री. वाणी, भोद येथील सरपंच राजूबापू पाटील, पिंप्री सरपंच नाना बडगुजर, वाघळूद येथील सरपंच सुकदेव पाटील, विकासो चेअरमन ईश्‍वर बच्छाव आणि ईश्‍वर पाटील, सोपान पाटील, आधार पाटील, पोलीस पाटील नानाभाऊ पाटील, रवींद्र पाटील, उपकार्यकारी अभियंता विजय गोसावी, विद्यत विभाग अधिकारी व कर्मचारी वृंद, नवलराजे पाटील, पीएसआय वाणी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीज वितरणच्या परिमंडळाचे अधिक्षक अभियंता फारूक शेख यांनी केले. त्यांनी या कामांच्या तांत्रीक बाबींविषयी इत्यंभूत माहिती दिली.

माजी मंत्री आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात प्रारंभीच गेल्या काही दिवसांमधील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले की, अगदी एखाद्या वास्तूत जरी आपण एक-दोन महिने राहिलो तरी ती आपल्या जीवनाचा भाग बनते. आम्ही तर गेल्या ३८ वर्षांपासून शिवसेनेत होतो. यामुळे वेगळा निर्णय घेतांना खूप वेदना झाल्या. मात्र मतदारसंघात परत आल्यानंतर जनतेने जो प्रतिसाद दिला त्यामुळे नवी उमेद आली. हे प्रेम हीच माझी उर्जा असून याच्या बळावरच आधीप्रमाणे कामे सुरू राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

आ. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, वीज हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. विशेष करून शेतीसाठी तर हा प्राणच आहे. यामुळे शेतकर्‍यांना अव्याहतपणे वीज पुरवठा करण्यासाठी भोद येथील वीज उपकेंद्रात ८३ लक्ष रूपयांच्या निधीतून नवीन रोहित्र बनविण्यात आले असून यात नवीन वीज वाहिन्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील जनतेला विनाखंड व्यवस्थीतपणे वीज पुरवठा होणार असल्याचा आशवाद त्यांनी व्यक्त केला. तर ग्रामविकासाच्या अन्य कामांनाही तातडीने मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ पाटील यांनी केले. तर आभार कार्यकारी अभियंता रमेश पवार यांनी मानले.

उपकेंद्र क्षमतावृध्दीचा परिसराला लाभ

भोद येथील ३३/११ वीज उपकेंद्रात आधी ५ एमव्हीए क्षमतेचे दोन तर ३.१५ एमव्हीए क्षमतेच्या एका रोहित्राचा समावेश होता. यातील भोद आणि हिंगोणा उपकेंद्रांवरील भार वाढल्यामुळे ३.१५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र वारंवार ट्रिप होऊन बंद पडत होते. यामुळे परिसरातील काही गावांना सकाळी सक्तीचे भारनियमन करावे लागत होते. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारंची दखल घेऊन आ. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून ८३ लक्ष रूपयांचा निधी मंजूर केला. यातून ३.१५ केव्हीए क्षमतेच्या रोहित्राच्या क्षमतेत वाढ करून तो ५ केव्हीए इतका करण्यात आला आहे. यासोबत नवीन वीज वाहिन्या देखील टाकण्यात आलेल्या आहेत. यामुळे लोड वाढला तरी या वीज उपकेंद्रावरील सर्व गावांना विनाखंड विद्युत पुरवठा होणार आहे.

Protected Content