जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | निवडणुकीच्या वादातून माजी सरपंचपती यांना पिस्तुल लावल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे घडली आहे. तर या प्रकरणी पोलीसांनी कार्यवाही न केल्याने पोलीस स्थानकात ठिय्या देण्यात आला.
या संदर्भातील माहिती अशी की, तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे निवडणुकीच्या रणभूमीच्या पार्श्वभूमीवर दोन पॅनल मध्ये लढत होत आहे. आज दिनांक १३ रोजी सहा वाजता माजी सरपंच पती अनिल राजाराम चौधरी हे गावात असताना गावातील एकाने त्यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावली. तुम्ही प्रचार थांबा अन्यथा तुम्हाला जीवे मारू अशी धमकी त्याने दिली.
दरम्यान, या घटनेबाबत अनिल राजाराम चौधरी व सरपंच पदाचे उमेदवार सुपडू बाविस्कर यांनी जामनेर पोलीस स्टेशनला माहिती दिली. मात्र तीन तास उलटूनही पोलिसांची मदत मिळाली नाही. त्यामुळे अनिल चौधरी तसेच काही ग्रामस्थ हे जामनेर पोलीस स्टेशनला आले. त्यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. मात्र यावेळी पोलीस व ग्रामस्थांमध्ये तू तू मै मै झाली. जोपर्यंत आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी यावेळी घेतला. यामुळे येथे बराच वेळ गोंधळ उडाला. जर फायरिंग करून देखील जर कारवाई होत नसेल तर सर्वसामान्यांना न्याय कुठे मिळणार ? असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने अखेर या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. या संदर्भात आता प्रक्रिया सुरू झाली आहे. तर या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.