‘राजमल लखीचंद’वर सीबीआयचा छापा : कर्ज प्रकरणात स्टेट बँकेची तक्रार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक राजमल लखीचंद ज्वेलर्स येथे सीबीआयच्या पथकाने छापा टाकून कसून चौकशी केल्याचे वृत्त आहे.

मंगळवार सकाळीच सीबीआयचे पथक जळगावात दाखल झाले. आर. एल. ज्वेलर्स तसेच ईश्‍वरबाबूजी जैन यांच्या निवासस्थानांची पथकाने कसून तपासणी केली. तसेच त्यांच्या मालकीच्या मानराज मोटर्स व नेक्सा या दोन दालनांमध्ये तपासणी करण्यात आली. यासोबतच काल दिवसभरात आर.एल. समूहाशी संबंधीत नाशिक आणि मुंबई येथे देखील छापे टाकण्यात आले. यात नेमके काय जप्त करण्यात आले याचा तपशील समोर आलेला नाही. तथापि, या कारवाईमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार आर.एल. समूहाने व्यवसाय वृध्दीसाठी स्टेट बँकेकडून ५२६ कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. याची वेळेत फेड करता न आल्यामुळे हे खाते एनपीए झाले आणि बँकेने याच्या वसुलीसाठी समूहाच्या चार मालमत्ता विकल्या. मात्र इतके होऊन देखील कर्जाची रक्कम बाकी असून हा आकडा १५०० कोटींवर पोहचल्याचे बँकेचे म्हणणे आहे. या संदर्भात मध्यंतरी दोन्ही बाजूंनी एकमेकांना जाहीर नोटीसा सुध्दा बजावण्यात आल्या होत्या. या प्रकरणास एसबीआयने सीबीआयकडे तक्रार केली होती. यातूनच हे छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत ही तपासणी सुरू होती.

Protected Content