‘स्ट्रॉंग रूम’मधील चोरीला गेलेला सीसीटीव्हीचा डिव्हीआर शोधा,अन्यथा फेर मतदान घ्या : काँग्रेस

congress

 

रामटेक (वृत्तसंस्था) उमरेडमधील स्ट्रॉंग रूमच्या सीसीटीव्ही यंत्रणेचा चोरीला गेलेला डिव्हीआर शोधा अन्यथा मतदारसंघात फेर मतदान घ्या, अशी मागणी रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी केली आहे. 12 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान उमरेडच्या स्ट्रॉंग रूममधील सीसीटीव्ही यंत्रणेतील डिव्हीआर आणि 2 मॉनिटर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून नागपूर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशिन्स मुख्य स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यासाठी प्रशासनाने विनाकारण 48 तासांचा कालावधी लावल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

 

 

रामटेक लोकसभेसाठी 11 एप्रिलला मतदान झाले होते. मतदानानंतर उमरेड विधानसभा क्षेत्रातील सर्व ईव्हीएम मशिन्स नियमानुसार उमरेडच्या तात्पुरत्या स्ट्रॉंग रूममध्ये गोळा करण्यात आले. 12 एप्रिलला संध्याकाळी सर्व ईव्हीएम नागपूरच्या मुख्य स्ट्रॉंग रूममध्ये पाठविण्यात आले. मात्र 12 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान उमरेडच्या स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही फुटेज असणारा डिव्हीआर चोरीला गेला. हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर काँग्रस पक्ष आक्रमक झाला आहे. चोरीला गेलेला डिव्हीआर शोधा नाहीतर मतदारसंघात फेर मतदान घ्या, अशी मागणी रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी केली आहे. तसेच जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षाच्या दबावात काम करत 11 एप्रिल च्या रात्री पासून 12 एप्रिल च्या दुपार पर्यंत ईव्हीएममध्ये गडबड केल्याचा आरोप गजभिये यांनी केला आहे. तसेच चोरीला गेलेल्या डिव्हीआर संदर्भात एफआयआर दाखल करून ते डिव्हीआर तात्काळ शोधण्याची मागणी केली आहे.

Add Comment

Protected Content