जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील तळेगाव येथील शेतकर्यांची फसवणूक करणार्या व्यापारी पिता-पुत्रासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की,तळेगाव येथील जनार्दन भामरे व त्यांचा मुलगा दीपक भामरे यांनी तळेगावसह परिसरातील शेतकर्यांकडून कपाशी, मका व तूर असा शेतमाल खरेदी केला. मात्र, नंतर शेतकर्यांचे पैसे थकल्याने शेतकर्यांनी व्यापारी पिता-पुत्राकडे तगादा लावला. मात्र पैसे न देता गेल्या आठ दिवसांपासून व्यापारी दीपक भामरे हा जामनेर येथील वाकीरोड येथील घरून पसार झाला. त्यामुळे शेतकर्यांनी जामनेर पोलिस ठाणे गाठून पोलिस निरिक्षक प्रताप इंगळे यांच्याकडे तक्रार केली. पोलिस निरिक्षक इंगळे यांनी भामरेसोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्याने बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात येतो व शेतकर्यांच्या पैशाचा विषय मार्गी लावतो असे आश्वासन दिले होते. मात्र, बुधवारी भामरे आलाच नाही. त्यामुळे शेतकरी सुरेश पुनमचंद माळी यांच्या तक्रारीवरून व्यापारी दिपक भामरे त्याचे वडील जनार्दन भामरे, व्यवस्थापक अरूण सिताराम सत्रे व कैलास जनार्दन भामरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. उपनिरिक्षक अंबादास पाथरवट तपास करताहेत.