अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिलेली जलयुक्त शिवार योजना ही नव्याने सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने जलयुक्त शिवार ही अतिशय महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली होती. यसााठी मोठा निधी देखील खर्च करण्यात आला होता. मात्र २०१९ साली महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झाल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली होती. तसेच यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत यातील काही कंत्राटांची चौकशी देखील लावण्यात आली होती. राज्यात शिंदे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर ही योजना नव्याने सुरू होणार असल्याचे सूतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांनी आज अकोल्यात याबाबत घोषणा केली आहे.
फडणवीस यांनी राज्यात जलयुक्त शिवार योजना नव्याने सुरू करण्याची घोषणा करतांना यातून राज्यातील प्रत्येक गाव हे जल संचयाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्याचा मानस बोलून दाखविला. तर त्यांनी याप्रसंगी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र देखील सोडले.