जळगाव-प्रवीण पाटील | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच राष्ट्राला समर्पित केलेल्या आयएनएस सुरत या युध्दनौकेवर प्रमुख तोफ अधिकारपदाची सुत्रे हे जळगावकर अथर्व अनिल भोकरे याच्याकडे आली असून ही बाब आपल्यासाठी खूप अभिमानास्पद अशीच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी मुंबई येथील शानदार कार्यक्रमात आयएनएस सुरत व आयएसएस निलगिरी या दोन युध्द नौका आणि आयएसएन वाघशीर ही पाणबुडी देशाला समर्पित केली. अर्थात या नौका व पाणबुडी आता नौदलाच्या सेवेत रूजू झाल्या आहेत. यात जळगावकरांसाठी अतिशय अभिमानाची बाब अशी की, आयएनएस सुरत या युध्दनौकेतील प्रमुख तोफ अधिकारी म्हणून लेप्टनंट अथर्व अनिल भोकरे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. या युध्दनौकेतील सर्वात महत्वाचा घटक हा तोफखाना असून याचीच सुत्रे ही अथर्व भोकरे यांच्याकडे आहेत.
भोकरे घराण्याचा तेजस्वी वारसा
अतिशय कर्तबगार अशा भोकरे घराण्यातील नव्या पिढीची पताका अथर्व भोकरे यांनी सांभाळली आहे. भोकरे कुटुंब हे मूळचे चाळीसगाव येथील आहेत. यात ज्येष्ठ बंधू सुनील भोकरे हे भारतीय नौदलात व्हाईस ॲडमीरल म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. नौदलातील दुसऱ्या क्रमांकाचे पद त्यांनी भूषविले आहे. तर लहान बंधू अनिल भोकरे हे कृषी संचालक या पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचेच पुत्र हे लेप्टनंट अथर्व भोकरे हे आहेत. त्यांची आई सुनीता भोकरे या एलआयसीत अधिकारी आहेत. आपल्या काकांचा आदर्श घेऊन त्याने नॅशनल डिफेन्स अकॅडमीतून मोठ्या जि द्दीने अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. त्याची प्रारंभी सब-लेप्टनंटपदी नियुक्ती झाली. तो 2021 मध्ये नौदलात रूजू झाला. आता त्याच्यावर आयएनएस सुरतचा तोफ अधिकारी म्हणून मोठी जबाबदारी आली आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब
लेप्टनंट अथर्व अनिल भोकरे यांनी आयएनएस सुरत या युध्दनौकेवरील प्रमुख तोफ अधिकारी म्हणून झालेली नियुक्ती ही जळगाव जिल्हावासियांसाठी अतिशय अभिमानास्पद अशीच आहे. तर, तरूणांनी नौदलाकडे एक उत्तम करियर म्हणून पहावे ही बाब देखील यातून अधोरेखीत झालेली आहे.
‘आयएनएस सुरत’ची महत्ता !
आयएनएस सुरत ही ‘डिस्ट्रॉयर’ अर्थात विनाशिका या प्रकारातील युध्दनौका आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने ती अतिशय महत्वाची मानली जात आहे. पी15बी या मालिकेतील ती चौथी युध्दनौका आहे. यावर अतिशय अद्ययावत अशी यंत्रणा असून ती शत्रूच्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास सक्षम आहे.