जळगाव प्रतिनिधी | तापी नदीच्या वरील बाजूला मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे काठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अतिवृष्टीमुळे चाळीसगावसह परिसरात मोठे नुकसान झाल्यानंतर आता तापी नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. आज २ सप्टेंबर रोजी हतनुर धरणावरील पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तापी नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन हतनूर धरणांमधून पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे तापी नदी काठावरील गावातील सर्व नागरिकांना व सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क रहावे असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
यात पुढे म्हटले आहे की, नदीच्या काठावरील गावातील लोकांनी तापी नदी पात्रांमध्ये जावू नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत. जिवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांना सतर्क राहून आपली काळजी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे.
दरम्यान, आज सकाळचा विचार केला असता हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणात सद्यस्थितीला ५८.८७ टक्के इतका जलसाठा असल्याचेही पाटबंधारे विभागातर्फे कळविण्यात आले आहे.