शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंपळे शिवारात सुरू होत असलेल्या स्टोन क्रेशर कंपनी सुरू करण्याचा परवाना रद्द करावा या मागणी धरणगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मागणीचे निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धरणगाव तालुक्यातील पिंपळे शिवारात गट नंबर १३८९/२ या क्षेत्र ही जागा कविता देविदास महाजन यांनी विकत घेतली आहे. त्यांनी त्या जागेवर मनुदेवी स्टोन क्रशर या नावाने परवाना घेऊन स्टोन क्रशरचा व्यवसाय चालू करण्याचा निमित्ताने कामाला सुरुवात केली आहे. या स्टोन क्रशरच्या व्यवसायाला परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. दरम्यान या स्टोन क्रशरमुळे या शिवारातील सुपीक जमिनीचे क्षेत्र हे नापीक होईल, तसेच या स्टोन क्रशरमुळे पिकांवर व फळांवर तसेच भाज्यांवर धूर बसून उत्पन्नात घट होऊन नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर भविष्यात उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून दिलेली परवानगी शासनाने तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी पिंपळे शिवारातील जमिनी असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कुठलीही मागणी मान्य न झाल्यास सर्व आत्महत्या करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर योगेश देवलाल चव्हाण, साहेबराव सुकलाल पाटील, आबा सुकलाल पाटील, गोविंदा शंकर माळी, रामा शंकर माळी, दलाल बुधा माळी, हरी सुकलाल माळी, रवी रामदास बन्सी, सुभाष जगन्नाथ चव्हाण यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी आमरण उपोषणात सहभाग नोंदविला आहे.

Protected Content