जळगाव प्रतिनिधी | ड्रायव्हिंग टेस्ट पास करण्यासाठी जळगाव विभागातील एसटीच्या १५० प्रशिक्षणार्थींकडून प्रत्येकी १५०० रुपये घेतल्याच्या आरोपातून सहायक वाहतूक निरीक्षकासह दोघांना निलंबित करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, राज्य परिवहन मंडळातर्फे दोन वर्षांपूर्वी ३ हजार ११६ चालक-वाहक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. ही निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर जळगाव विभागातील १७३ चालक-वाहकांची निवड करण्यात आली. यानंतर त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. सहायक वाहतूक निरीक्षक सतीश सातपुते यांनी ड्रायव्हिंग टेस्ट पास करण्यासाठी यातील १५० प्रक्षिणार्थींकडून प्रत्येकी १५०० रुपयांची मागणी केली होती. तर लाइन चेकिंगचे वाहतूक निरीक्षक बाबू तडवी यांनी त्यांना साथ दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
दरम्यान, पैशांची मागणी करण्यात आल्याची तब्बल दीडशे प्रशिक्षणार्थींनी लेखी तक्रार केली होती. या उमेदवारांकडून सुमारे सव्वादोन लाख रूपये जमा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, बाबू तडवी हे आकसापाटी कारवाई करत असल्याच्या तक्रारी देखील दाखल होत्या. या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोघांना निलंबीत करण्यात आले आहे.