खुशखबर : मन्याड धरण ओव्हरफ्लो; विसर्ग झाला सुरू !

जळगाव प्रतिनिधी | गिरणाची प्रमुख उपनदी असणार्‍या मन्याडवरील मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरला असल्याने सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे खालील बाजूस असणार्‍या खेड्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, मन्याड मध्यम प्रकल्प पूर्ण भरला असून आज २६ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० वा. मन्याड मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा १०० टक्के झाला असून प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या सांडव्यावरून पुराचा विसर्ग सुरू झालेला आहे.

यामुळे मन्याड नदीच्या व गिरणा नदीच्या काठावरील गावातील लोकांनी नदीत जावू नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत. जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांनी सतर्कता बाळगून आपली काळजी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगांव व उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी केलेले आहे. यंदा आतापर्यंत अल्प पाऊस झाला असल्याने बहुतांश जलसाठ्यांमध्ये वाढ झालेली नसतांना मन्याड मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागल्याने याचा परिसरातील शेतकर्‍यांचा लाभ होणार आहे.

Protected Content