Home Cities जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९३.५७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९३.५७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

0
184


जळगाव- -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा २९३.५७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शनिवारी (१४ मार्च) आयोजित अधिसभेच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन झाल्टे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात १५.४४ कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली असून, मागील वर्षाच्या तुलनेत या तुटीत २.४३ कोटी रुपयांची घट झाली आहे. अनावश्यक खर्च कमी करून शैक्षणिक आणि रचनात्मक विकासावर भर देणारे हे अंदाजपत्रक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या अर्थसंकल्पात परिरक्षणासाठी २१३.९२ कोटी, योजनांतर्गत विकासासाठी ४५.०५ कोटी आणि विशेष कार्यक्रमांसाठी ३४.६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महसुली खर्चासाठी १८५.९३ कोटी तर भांडवली खर्चासाठी २७.९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आले आहेत. विद्यापीठाने यावर्षी तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पाच महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदींचे डिजिटायझेशन आणि ब्लॉकचेन आधारित पदवी प्रमाणपत्रांसाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, बदलत्या काळाची गरज ओळखून विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साक्षरता व विकास अभियान’ राबविण्यात येणार असून, त्यासाठी १.२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विज्ञान शिक्षणाला चालना देण्यासाठी ‘कुलगुरू विज्ञान प्रात्यक्षिक योजना’ आणि खेळाडूंसाठी ‘आंतरप्रशाळा क्रीडा उत्सव’ या नवीन उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे.

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विविध विभागांच्या निधीत मोठी वाढ करण्यात आली आहे. विद्यार्थी विकास विभागाचा निधी ७६० लाखांवरून ९३१ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आला असून, यांतर्गत आपत्ती व्यवस्थापन कक्ष, चाणक्य स्पर्धा परीक्षा केंद्र आणि ग्राम दत्तक योजना पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत. क्रीडा विभाग, संशोधन विभाग आणि ‘अविष्कार’ महोत्सवाच्या निधीतही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. युवक महोत्सवासाठीच्या तरतुदीत वाढ करून सांस्कृतिक उपक्रमांना बळ देण्याचा प्रयत्न विद्यापीठाने केला आहे.

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान दीपक पाटील, डॉ. मनीषा कायंदे यांच्यासह विविध सदस्यांनी काही कपात सूचना मांडल्या होत्या, मात्र वित्त अधिकारी सीए रवींद्र पाटील यांनी केलेल्या खुलाशानंतर या सूचना मागे घेण्यात आल्या. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी उत्तरे दिली. बैठकीच्या प्रारंभी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी कुलसचिव डॉ. एम. व्ही. बरीदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीला विद्यापीठाचे विविध प्राधिकरणांचे सदस्य, प्राचार्य आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound