जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा येथील तरूणाला दोन जणांनी लुटल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिलाष रमेश येवले (वय २८, रा. पाचोरा) हे शासकीय ठेकेदार आहेत. २७ रोजी नेहमीप्रमाणे ते पाचोर्याहून प्रवासी वाहनाने जळगावात आले. रात्री उशिरापर्यंत काम केल्यानंतर त्यांचे सहकारी ओम जांगीड यांच्या कारने नुक्कड कॉर्नरपर्यंत आले. तेथे दुसर्या वाहनाची वाट पाहत येवले उभे होते. या वेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांना दुचाकीवर पाचोरा येथे सोडून देण्याचे सुचविले. परंतु, ते ओळखीचे नसल्याने येवलेंनी जाण्यास नकार दिला. याचा राग आल्यानंतर ‘तू येथे कोणाचा तरी खुन करण्यासाठी आला आहे, तुझ्याकडे चाकू आहे, आम्हाला तुझी झडती घेऊ दे’ असे बोलुन भामटे त्यांची जबरदस्तीने झडती घेऊ लागले. येवलेंनी विरोध करताच या दोघांनी त्यांना मारहाण करुन पॅन्टच्या खिशातील सहा हजार रुपये रोख व ३० हजार रुपयांचा मोबाइल काढून पोबारा केला.
या प्रकरणी अभिलाष येवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणी रात्री एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.