कैद्याचा मारहाणीत मृत्यू : तुरूंग अधिक्षकांसह पाच जणाविरूध्द गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील कैद्याचा भुसावळच्या दुय्यम कारागृहात झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्या प्रकरणी तत्कालीन तुरूंग अधीक्षकांसह चार तुरूंग रक्षकांविरोधात भुसावळ शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, चांगदेव येथील सुनील भागवत तारू ( वय ४०, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर) यांना मुक्ताईनगर न्यायालयाच्या आदेशानुसार २९ फेब्रुवारी २०२० रोजी मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली होती. यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तारू यांना भुसावळ दुय्यम कारागृहात हलवण्यात आले होते. येथे त्यांना तुरूंग अधिक्षक आणि तुरूंग रक्षकांनी मारहाण केली होती. यामुळे त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.

यानंतर सुनील तारू यांना न्यायालयात दाखल करण्यात आले होते. येथे ४ मार्च २०२० रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र शवविच्छेदन अहवालाच्या निष्कर्षानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या प्रकरणी मयताची पत्नी मंगला सुनील तारू (वय ३५, रा. चांगदेव, ता.मुक्ताईनगर) यांनी भुसावळ शहर पोलिसात मंगळवारी दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन तुरूंग अधीक्षक नागनाथ महादेव भानोसे, तुरूंग रक्षक व हवालदार सुभाष बाबूराव खरे, हवालदार भानुदास निवृत्ती पोटे, सीताराम विठ्ठल कदम आणि अनिल श्रीराम बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन पडघन करीत आहेत. कैद्याच्या मृत्यू प्रकरणी तुरूंग अधिक्षकांसह पाच कर्मचार्‍यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Protected Content