जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांना मोक्का लावण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे आटापीटा करत होते. त्यांच्या विरूध्दची एफआयआर ही देखील त्यांनीच ड्रॉफ्ट केली होती. चव्हाण यांनी अनेक गैरकृत्ये केली असून आपण त्यांचा खोटारडेपणा जगासमोर आणणार आहोत, असा गौप्यस्फोट आज तेजस मोरे याने केला आहे. हे सर्व एकनाथराव खडसे यांच्यासह अन्य नेत्यांच्या सांगण्यावरून ते करत असल्याचा दावा देखील तेजसने केला असून याचे सर्व पुरावे आपल्याकडे असून ते योग्य वेळेस मांडणार असल्याचा दावा देखील त्याने केल्याने खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्हिडीओ बॉंब टाकल्यानंतर काल सकाळी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी मूळचा जळगाव येथील रहिवासी असणार्या तेजस मोरे यांनी आपल्या कार्यालयात घड्याळातील छुप्या कॅमेर्यातून स्टींग ऑपरेशन केल्याचा दावा केला. यामुळे काल सकाळपासून तेजस मोरे याचा शोध प्रसारमाध्यमांनी सुरू केला. दरम्यान, त्याच्या जळगाव येथील घरी पत्रकार पोहचले तरी तेथे भाडेकरू राहत असल्याची माहिती मिळाली. तर त्याच्या कुटुंबाविषयी प्राथमिक माहितीच्या पलीकडे काही हाती लागले नाही. जळगाव येथे तेजस मोरे याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तेजस मोरे याने न्यूज-१८ लोकमत या वाहिनीच्या प्रतिनिधीला फोन करून या प्रकरणी पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली. तो म्हणाला की, एका प्रकरणात जामीन मिळावा म्हणून आपण प्रवीण चव्हाण यांच्या संपर्कात आलो. यानंतर आपले त्यांच्याकडे येणे-जाणे वाढले. आपले इंग्रजी चांगले असल्यामुळे त्यांची काही प्रकरणे आपण ड्रॉफ्ट करू लागलो. दरम्यान, एकनाथराव खडसे आणि अन्य नेत्यांशी प्रवीण चव्हाण यांचे नेहमी संभाषण होत असल्याचे आपल्या समोर आढळून आले. त्यांच्याशी झालेल्या वार्तालापानंतर प्रवीण चव्हाण यांनी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना मोक्का लावण्याची तयारी सुरू केली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गैरप्रकार उघडकीस आणला आहे. आपण वाचताय लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट !
प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे याने स्टींग केल्याचा आरोप केला असला तरी मोरे याने हे आरोप साफ फेटाळून लावले आहेत. तो म्हणाला की, चव्हाण हे गैरप्रकार करत असल्याचे आपल्या लक्षात आले. या संदर्भात आपण काही वकील मित्रांशी चर्चा केली असता हा सर्व गंभीर प्रकार असल्याचे आपल्याला दिसून आले. यातून आपण त्यांच्यापासून दूर होत गेलो असा दावा तेजस मोरे याने केला. दरम्यान, आमदार गिरीश महाजन आणि आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बर्हाटे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या फिर्याद या प्रवीण चव्हाण यांनी तयार केल्या आणि आपण याचा ड्रॉफ्ट तयार केल्याचा दावा देखील त्याने केला. काहीही करून गिरीश महाजन यांना मोक्का लावावा यासाठी प्रवीण चव्हाण हे आटापीटा करत असल्याचा आरोप त्याने केला. आपण वाचताय लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट !
आपल्या जामीनासाठी प्रवीण चव्हाण यांनी चार लाख रूपयांची फी ठरविली होती. यातील तीन लाख ८५ हजार रूपये आपण त्यांना वेळोवेळी दिले असून याचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत. तर उर्वरित १५ हजार रूपये आपण त्यांना देणे लागत असल्याचे मत तेजस मोरे यांनी या मोबाईलवरून दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये व्यक्त केले. प्रवीण चव्हाण यांची कारस्थाने आणि त्यांचा खोटारडेपणाचे आपल्याकडे सर्व पुरावे आहेत. यात व्हाटसऍप चॅटसह अन्य पुराव्यांचा समावेश असल्याचा दावा देखील त्याने केला. याबाबत आपण स्वत: लवकरच प्रसारमाध्यमांच्या समोर पुरावे मांडणार असल्याची माहिती देखील त्याने दिली. आपण वाचताय लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट !
आपण प्रवीण चव्हाण यांना एसी आणि अन्य साधने भेट म्हणून देण्याच्या कोणत्याही ऑफर केल्या नव्हत्या असे तेजस मोरे याने स्पष्ट केले आहे. तर या सर्व प्रकारात प्रवीण चव्हाण हे एकनाथराव खडसे यांच्यासह इतर नेत्यांशी सातत्याने संपर्कात असल्याचा दावा देखील त्याने केला आहे. दरम्यान, जळगावात जानेवारीच्या प्रारंभी टाकण्यात आलेल्या धाडीतील पोलिसांची सर्व सरबराई ही आपणच केली असल्याचेही त्याने म्हटले आहे. आपण वाचताय लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट !
दरम्यान, फडणवीस यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर तेजस मोरे याने पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांच्या समोर आपली बाजू मांडल्याने खळबळ उडाली असून त्याने केलेल्या दाव्यांबाबत चर्वण सुरू झाले आहे. या प्रकरणी आता तो खरोखर काय पुरावे मांडणार ? तो याबाबत तक्रार करणार का ? याबाबत आता उत्सुकता लागली आहे.