जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील वासुकमल या निवासी संकुलातील तक्रार करून देखील अद्यापही कोणतीही कारवाई न झाल्याने माजी नगरसेवक अमर जैन यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी शहरातील वासुकमल या इमारतीमधील रहिवासी आणि बिल्डरमधील वाद गाजला होता. या निवासी संकुलातील रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या नगरचना विभागाने संबंधित बिल्डरला नोटीस बाजवली होती. ही नोटीस बजावून तीन महिने उलटले असून महापालिकेकडून अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. महापालिकेने येत्या आठ दिवसामध्ये कारवाई करावी अन्यथा १३ फेब्रुवारीपासून महापालीकेसमोर उपोषण करण्याचा इशारा माजी नगरसेवक अमर जैन यांनी दिला आहे.
या संदर्भात अमर जैन यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महापालिकेच्या नगररचना विभागाने वासुकमल इन्फ्रा या बिल्डरला चुकीच्या पद्धतीने मंजुरी दिली आहे. पिंप्राळा गट नंबर २०/२ येथे बांधलेल्या अपार्टमेंन्टमध्ये दोन्ही बाजूने महापालिकेच्या ओपन स्पेसमधून रस्ता दिला आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, या इमारतीमधील ४८ फ्लॅटधारकांची समस्या असून बिल्डिंगबाबत सर्वांनी एकत्रित येवून महापालीकेकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर २२ ऑक्टोबर २०२१ रोजी नगररचना विभागाने बिल्डरला नोटीस बजावून विविध १२ मुद्यावर खुलासा मागविला आहे. या प्रकरणात संबंधित नगरचना विभागाचे अधिकारी आणि बिल्डर, आर्किटेक्ट यांच्यासह दोषीवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत कारवाई न झाल्यास १३ फेब्रुवारी रोजी महापलिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा महापालिका आयुक्त सतीश कुळकर्णी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आलेला आहे.