जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रा.प. महामंडळाच्या माध्यमातून राज्यात सर्वाधीक किलोमीटर तसेच उत्पन्न मिळवून दिल्याबद्दल जळगावचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार भरत गोगावले, ‘एसटी’चे सदिच्छादूत तथा अभिनेते मकरंद अनासपुरे, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, ‘एसटी’चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त श्री. विवेक भिमनवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे ते अहमदनगर या पहिल्या बसचे वाहक स्व. केवट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ’अमृत महोत्सव महाराष्ट्राच्या लोकवाहिनीचा’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच २५ वर्ष सतत विना अपघात सेवा देणार्या पाच चालकांचा सत्कार करण्यात आला.
तसेच उत्कृष्ट कामगिरी करणार्या राज्यातील तीन विभागांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये जळगाव, जालना व भंडारा विभागांचा समावेश आहे. जळगाव विभागाने सर्वाधीक किलोमीटरच्या प्रवासासह सर्वाधीक उत्पन्न मिळवल्याचा बहुमान प्राप्त केला आहे. या अनुषंगाने जळगाव विभागाचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणार्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर व चोपडा या आगारांना देखील सन्मानीत करण्यात आले.