जळगाव प्रतिनिधी । शहरातील श्रद्धा कॉलनीच्या बाजूला असलेल्या नंदनवन नगरात आज सकाळी दोन ठिकाणी घरफोडी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, भरदिवसा दोन घरफोड्या झाल्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
याबाबत माहिती अशी की, विश्वनाथ श्रीधर चौधरी प्लॉट नंबर 5 नंदनवन नगर हे आपल्या पत्नीसह सकाळी 9 वाजता औरंगाबाद येथे मुलाला भेटायला गेले होते. तर मुलगा उमेश चौधरी हा महाविद्यालयात पेपर देण्यासाठी गेला होता. याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास बंद घर फोडून घरातील सोने-चांदीसह रोख रक्कम चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र किती ऐवज चोरीस गेले याबाबत अद्याप ही स्पष्ट झालेले नाही आहे.
तर त्याच गल्लीतील रहिवासी शरद सुधाकर चव्हाण हे देखील काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्याचवेळी या चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटातील सामान अस्ताव्यस्त केला आहे. या घटनेबाबत रामानंदनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.