जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात कुणाचे आव्हान कुणाला?

 

धरणगाव : कल्पेश महाजन

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास शिवसेनाच प्रथम क्रमांकावर आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गतनिवडणुकीप्रमाणे महायुती न झाल्यास शिवसेनेला पुन्हा फायदाच आहे. मात्र, युती झाल्यास त्याचा फटका शिवसेनेचे विद्यमान आमदार ना.गुलाबराव पाटील यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपसोबत युती करून लढणे शिवसेनेला कधीही आवडत नाही. कारण याचा फायदा नेहमीच कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला झाल्याचा इतिहास आहे. २०१४ च्या तुलनेत या मतदारसंघात शिवसेना व भाजपने जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपालिकेत देखील प्राबल्य वाढवले आहे. तर दुसरीकडे मात्र,राष्ट्रवादी गलितगात्र झाल्याचे चित्र आहे. एकंदरीत आगामी विधानसभेच्या दृष्टीने मते खेचण्यासाठी सर्वच पक्षाकडून व्यूहरचना रचण्यास आतापासूनच सुरूवात झाली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राजकीय चित्र नेमके असेल, यावर देखील जळगाव ग्रामीण विधानसभेचे राजकीय गणित अवलंबून राहणार आहे.

 

थोड्याच दिवसात लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडायला सुरुवात होणार आहे. लोकसभेच्या काळातच विधानसभेच्या विजयाची मुहूर्तमेढ रचण्याचा जवळपास सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न राहणार आहे. प्रत्येक पक्ष आप्रत्येक निवडणुकीत आपलेच पारडे कसं जड आहे, हे मतदारांना सांगण्याचा कायमच प्रयत्न करत असतो. परंतु प्रत्येक पक्षाची ताकत विविध संस्थांमध्ये त्याच्या निवडून आलेल्या उमेदवारांच्या संख्येवरच ठरत असते. आजच्या घडीला जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदार संघात शिवसेना,राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये खरी लढत आहे. गेल्यावेळी देखील या तिघं पक्षाच्या अवती-भवतीच निवडणूक रंगली होती. परंतु मागील पाच वर्षात पुला खालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राजकीय बलाबल लक्षात घेता शिवसेना व भाजपमध्येच खरी लढत दिसत असली तरी, राष्ट्रवादी देखील आपले तोकडे का असेना पण अस्तित्व राखून आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात कोणत्या पक्षाचे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष, नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,सभापती,उपसभापती यासह २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा अभ्यास केला असता, येणारी विधानसभा कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराकरता सोपी नाहीय, हे आपल्या लागलीच लक्षात येईल. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजप,राष्ट्रवादी तसेच शिवसेनेचे काही बलस्थान तर काही कमकूवत बाजू देखील आहेत. एवढेच नव्हे तर, या तीनही पक्षाच्या संभाव्य उमेदवारांच्या देखील जमेच्या बाजू तसेच उणीवा लक्षात घेतल्या तर विधानसभेची रंगत जोरदार होईल यात शंका नाहीय. गतनिवडणुकीतील मोदी लाटमुळे भाजपला मोठं मतदान झाले होते. परंतु यावेळी परिस्थिती बदलेली आहे.

 

नगरपालिकेत शिवसेनेची पकड मजबूत

 

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात धरणगाव ही एकमेव नगरपालिका आहे. या पालिकेत एकूण २० नगरसेवक आहेत. त्यात शिवसेनेचे १४ तर भाजपचे ८ नगरसेवक आहेत. २०११ च्या तुलनेत धरणगाव पालिकेत भाजपने आपली मजबूत पकड बनविली आहे. कारण २०११ मध्ये या ठिकाणी भाजपचे अवघे दोन नगरसेवक होते. मात्र, २०१६ मध्ये येथे भाजपचे तब्बल ६ नगरसेवक निवडून आले आहेत. धरणगाव पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी शिवसेनेने सलीम पटेल हे विराजमान असले तरी, भाजपचे संजय महाजन हे अवघ्या ८० मतांनी पराभूत झाले होते, हे विसरण्यासारखे नाहीय. पालिकेत शिवसेनेचाच उपनगराध्यक्ष असून भाजपकडे विरोधी पक्ष नेते पद आहे. एकंदरीत पालिकेत शिवसेना-भाजपची स्थिती मजबूत आहे. दुसरीकडे मात्र, २०११ मध्ये तब्बल १० नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला मात्र, २०१६ मध्ये साधे खाते देखील उघडता आलेले नाहीय. पालिकेच्या राजकारणातून राष्ट्रवादी जणू बाहेरच फेकली गेलेली असून विधानसभेच्या काळात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

 

जिल्हा परिषद व पंचायत समितीतील स्थिती

 

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात एकूण जिल्हा परिषदेचे एकूण ८ गट तर पंचायत समितीचे १६ गण आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे सर्वाधिक ३-३ सदस्य शिवसेना व भाजपचे आहेत. तर २ सदस्य राष्ट्रवादीकडे आहेत. जळगाव ग्रामीण मतदार संघात जळगाव व धरणगाव अशा दोन पंचायत समित्या आहेत. दोन्ही पंचायत समितीचे एकूण १६ सदस्य आहेत. त्यात सर्वाधिक १० पं.स. सदस्य हे शिवसेनेचे तर भाजपकडे ४ सदस्य आहेत. जळगाव पंचायत समितीत १० पैकी ५ तर धरणगाव पंचायत समितीतील ६ पैकी ३ जागा शिवसेनेकडे आहेत. जळगाव पंचायत समितीत २ सदस्य हे अपक्ष निवडणून आले आहेत. जळगाव पंचायत समितीला भाजप तर धरणगावला शिवसेनेचे सभापती असून दोन्ही पंचायत समितीत उपसभापती पद शिवसेनेकडे आहे. एकंदरीत नगरपालिकेप्रमाणे पंचायत समितीत देखील राष्ट्रवादी अस्तित्व शून्य आहे. या गोष्टीचा राष्ट्रवादीला फटका तर शिवसेनाला जबरदस्त फायदा होऊ शकतो. त्याच प्रमाणे भाजप देखील मुसंडी मारू मारू शकते.

 

विधानसभा २०१४ मधील स्थिती

 

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात २०१४ मध्ये फारच गंमतीशीर परिस्थिती होती. राज्यात युती व आघाडी न झाल्यामुळे पहिल्यांदा सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढत होते. विविध विकास कामे केल्यामुळे राष्ट्रवादीचे तत्कालीन विद्यमान आमदार गुलाबराव देवकर यांची प्रतिमा चांगली होती. परंतु घरकुल घोटाळ्यात त्यांना कारागृहात जावे लागल्यामुळे त्यांना तेथूनच निवडणूक लढवावी लागली होती. कारागृहातून निवडणूक लढवीत असतांना देखील या मतदार संघातील सर्वात मोठे असलेले धरणगाव शहरातून देवकर यांना मताधिक्य मिळाले होते. परंतु २००९ मध्ये पराभूत झाल्यामुळे शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्या बद्दल सहानभूती होती. तसेच त्यांनी देवकर कारागृहात असल्याचा भरपूर फायदा उचलत आक्रमक प्रचार करून २०१४ मध्ये विजय संपादन केला होता. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना ८४०२० तर गुलाबराव देवकर यांना ५२६५३ मते मिळाली होती. दुसरीकडे भाजपच्या उमेदवाराला मोदी लाटचा चांगला फायदा झाला होता. त्यामुळे पी.सी.पाटील यांनी अनेपक्षित ४४०११ मते घेतली होती. कॉंग्रेसचे उमेदवार डी.जी.पाटील यांना मात्र, ३९६८ मतांवर समाधान मानावे लागले होते. तर मनसेचे मुकुंदा रोटे यांना तर अवघी १२५६ मते मिळाली होती.

 

संभाव्य उमेदवारांचे बलस्थान आणि कमकूवत बाजू

 

या मतदारसंघात शिवसेनेचे संघटन इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत खूप मोठे आणि घट्ट आहे. त्याच प्रमाणे शिवसेनेचे विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांच्याकडे मंत्रीपद असल्यामुळे मतदार संघात विविध विकासकामे मार्गी लावण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. तसेच प्रभावी वक्ते असल्यामुळे प्रचार सभांवर पकड निर्माण करत मते मिळविण्यात यशस्वी ठरतात. वैयक्तिक जनसंपर्क देखील मोठा असून जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगर पालिकेतील वर्चस्वाचा ना. पाटील यांना मोठा फायदा होईल, किंबहुना हीच बाब त्यांचे सर्वात मोठे बलस्थान असेल. ना.पाटील हे मंत्री असून देखील पाहिजे तशी विकास कामे होऊ शकली नसल्याचा विरोधाकांचा आरोप त्यांच्या दृष्टीने आजच्या घडीला सर्वात मोठी कमकूवत बाजू आहे. तसेच पालिकेतील नाराजीचा फटका देखील त्यांना धरणगावातून पुन्हा एकदा बसू शकतो. दुसरीकडे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मतदार संघ पिंजून काढत वाढवलेला वैयक्तिक जनसंपर्क आजच्या घडीला त्यांचे सर्वात मोठे बलस्थान आहे. मृदू भाषिक असल्यामुळे पहिल्याच भेटीत कुणालाही आपलंसं करण्याची जादू देवकर यांच्याकडे आहे. परंतु पक्ष संघटना फारच कमकूवत असल्याचा फटका त्यांना बसू शकतो.

 

नगर पालिकेनंतर अनेक निष्टावन कार्यकर्ते देवकर यांना सोडून शिवसेना किंवा भाजपकडे गेले आहेत. त्या नाराज लोकांचा धरणगावात देवकर यांना फटका बसू शकतो. त्याच प्रकारे पंचायत समिती व नगरपालिकेत असलेले शून्य अस्तित्व आजच्या घडीला देवकर यांची सर्वात मोठी कमकूवत बाजू आहे. २०१४ मध्ये सर्वच वातावरण पोषक असतांना देखील भाजपचे उमेदवार पी.सी.पाटील हे गतवेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यामुळे यंदा त्यांची उमेदवारी मिळेल किंवा नाही याबाबत शंकाच असून त्यांच्या जागेवर भाजपचे तालुकाध्यक्ष संजय महाजन किंवा जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवने यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यातील धरणगावचे संजय महाजन यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.कारण त्यांच्या नेतृत्वातच धरणगाव पालिकेत शून्यावरून ६ जागांवर भाजपला विजय मिळविता आला. त्याच प्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीत देखील चांगले यश संपादन केले आहे. एवढेच नव्हे तर, शिवसेनेची पारंपारिक जिल्हा परिषदची साळवा-नांदेडची जागा संजय महाजन यांच्याचमुळेच आजच्या घडीला भाजपकडे आहे. तसेच गुलाबराव पाटील यांच्या प्रमाणेच श्री.महाजन हे देखील आक्रमक भाषणासाठी ओळखले जातात. तसेच तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणे ही, त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. परंतु आर्थिक सक्षम नसणे,ही श्री. महाजन यांची सर्वात मोठी कमकूवत बाजू आहे.

Add Comment

Protected Content