किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये दंगल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील काट्या फाईल भागात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये रात्री उशीरा दंगल उसळली असून यात एक होमगार्ड जखमी झाल्याचे वृत्त आहे.

काल रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास काट्या फाईल भागात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. एका बालिकेला मारण्याच्या वादातून दोन गट आमने-सामने आल्याने परिसरात तणाव पसरला. याप्रसंगी जोरदार दगडफेक करण्यात आल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्मित झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे, शहर पोलिस ठाण्याचे विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांचा ताफा आल्यानंतर दगडफेक करणारे दोन्ही गट पळून गेले. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी शनिपेठ पोलिसान गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, या दगडफेकीत विलास देसले हे होमगार्ड जखमी झाले असून एकाच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील उपद्रवींची माहिती घेतली असून रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध सुरू केला होता. दरम्यान, परिसरातील वातावरण नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Protected Content