रेडक्रॉसच्या मेडिकल व्हॅनचे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | इंडियन रेडक्रॉस संघटनेच्या मेडिकल व्हॅनचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते करण्यात आला.

इंडियन रेडक्रॉस सोसायटी येथे कोरोना काळातील जळगावचे उल्लेखनीय कार्य लक्षात घेता कॅनडियन रेडक्रॉसच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय शाखा नवी दिल्ली व राज्य शाखा मुंबई यांच्या सहकार्याने अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा मेडिकल व्हॅनचा उद्घाटन सोहळा रेडक्रॉस पदसिध्द अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, रेडक्रॉसचे कोषाध्यक्ष शेखर सोनाळकर, आपत्ती व्यवस्थापन चेयरमन सुभाष सांखला, कार्यकारीणी सदस्य भालचंद्र पाटील, सौ. पुष्पाताई भंडारी, सौ शांताताई वाणी, विश्वनाथ जोशी व मान्यवर उपस्थित होते.

रेडक्रॉस राष्ट्रीय शाखा नवी दिल्ली आणि राज्य शाखा मुंबई यांच्या मार्फत रेडक्रॉस जळगावला प्राप्त झालेले ३००० पल्स ऑक्सिमिटर, प्रथमोपचार प्रशिक्षणासाठी लागणारी मॅनिकिन, २० ऑटोमेटेड ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, रॅपटोकोस कंपनी मुंबई यांच्यामार्फत मिळालेले थ्रेप्टिन प्रोटीन बिस्कीट इत्यादी साहित्याची माहिती आणि मेडिकल व्हॅनच्या भविष्यातील उपक्रमाबाबत माहिती सांगत रेडक्रॉसचे चेअरमन विनोद बियाणी यांनी प्रास्ताविक केले.

रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी रेडक्रॉसच्या सद्य परिस्थितीतील सुरु असलेल्या सर्व उपक्रमाबाबत माहिती दिली. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी रेडक्रॉस अतिशय सेवा भावनेतून कार्य करीत असून सर्वांना मन पूर्वक शुभेच्छा देतो अशा शब्दांत मनोगत व्यक्त केले. पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि जळगाव शहरात सामाजिक कार्यासाठी असणारी स्पर्धा हि मनाला भावणारी आहे, या भावनेतूनच अनेक गरजू नागरिकांची मदत होत आहे. भविष्यातील उपक्रमासाठी मन:पूर्वक शुभेच्छा अशी भावना हि त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, आज उद्घाटन झालेल्या रेडक्रॉसच्या माध्यमातून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या तत्वानुसार मेडिकल व्हॅन द्वारे संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात व आदिवासी नागरिकांना रुग्णसेवा देण्यात येणार आहे. यात जनरल रुग्ण तपासणी, दंतरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, स्त्री रोग तपासणी, बाल रोग तपासणी आणि आवश्यकतेनुसार इतर तपासण्या देखील करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जनरल प्रॅक्टिशनर असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. धनराज चौधरी, निमाचे अध्यक्ष डॉ. सतीश चौधरी, डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. लीना बोरोले, डॉ. राजेश सुरळकर यांना प्रातिनिधिक स्वरुपात पल्स ऑक्सिमिटर वितरण करण्यात आले. तसेच थॅलेसीमिया अमृत योजनेत योगदान देणार्‍या देणगीदात्यांचा सन्मान हि करण्यात आला. तसेच निक्षय मित्र योजनेअंतर्गत टी.बी. ग्रस्त रुग्णांना पोषक आहार किट्सचे वाटप करण्यात आले. शाहू महाराज हॉस्पिटल मधील रुग्णांसाठी प्रातिनिधिक स्वरुपात मॅन्युअल व्हेटीलेटर देण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून व फित कापून मेडिकल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांनी केले व आभार रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी व्यक्त केले.

Protected Content