
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘ड्रॉप केस’च्या माध्यमातून फसवणुकीसाठी कुप्रसिद्ध ठरलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील पाच गावांवर जळगाव पोलिसांनी पहाटे मोठी कारवाई करत ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ राबविले. या धडक मोहिमेत मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि आरसीपी पथकाने सहभागी होत संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, शस्त्रे, वाहने, मोबाईल आणि वन्यजीव अवशेष जप्त करण्यात आले आहेत. जळगाव पोलिसांच्या या कारवाईला गुन्हेगारीविरोधातील मोठा ‘सर्जिकल स्ट्राइक’ मानले जात आहे.

मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा ही गावे गेल्या अनेक वर्षांपासून विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यांमुळे चर्चेत आहेत. अल्प लोकसंख्या असलेल्या या गावांमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. पोलिसांच्या तपासात या भागातून काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सफेद बिबा, उलटी वासन, सुलेमानी पत्थर, सेकंड करन्सी, अॅल्युमिनियम भंगार, जुने सोने, कॉपर, शंख आणि डबल इंजिन यांसारख्या कथित दुर्मिळ वस्तूंचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून लोकांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या आमिषाला बळी पडलेले नागरिक संबंधित गावांमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना बनावट नोटा, नकली वस्तू किंवा खोट्या मौल्यवान वस्तू दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. काही प्रकरणांमध्ये कोणतीही वस्तू न देता थेट पैसे हिसकावले जात असल्याचेही समोर आले आहे. विरोध करणाऱ्या व्यक्तींना मारहाण करून लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे काही पीडित व्यक्तींकडे बनावट हरणाचे किंवा वाघाचे कातडे ठेवून त्यांचे व्हिडिओ चित्रीत केले जात होते. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केल्यास वन्यजीव तस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्यांना गप्प केले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांच्या भाषेत या प्रकारच्या गुन्ह्यांना ‘ड्रॉप केस’ म्हणून ओळखले जाते.
या परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मागील तीन वर्षांत विविध गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये दरोड्याचे १०, खुनासह दरोड्याचा १, खुनाचा १, जबरी चोरीचे ७, फसवणुकीचे १६, दरोड्याच्या प्रयत्नाचा १ आणि सरकारी नोकरावर हल्ल्याचे २ गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली १९ जून २०२६ रोजी पहाटे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. हलखेडा, लालगोटा आणि मधापुरी या गावांमध्ये एकाच वेळी मोठ्या पोलीस फौजेसह धाडसत्र राबविण्यात आले.
या कारवाईत संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, विविध गुन्ह्यांशी संबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका प्रकरणात मधापुरी येथील फरेज राजू पवार (वय ४०) याच्याकडून गावठी रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हलखेडा येथील रामजाने राईसाहेब भोसले (वय ३२) याच्याकडून लोखंडी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे तसेच बनावट नोटांचे दोन बंडल जप्त करण्यात आले आहेत. तसेच आक्काबाई जोगिंदर भोसले (वय ३२) हिच्याकडून ६ लाख ४२ हजार ९०० रुपये रोख रक्कम, १७ मोबाईल आणि सुमारे ३६ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. रोहित सुदेश पवार (वय ३२, रा. मधापुरी) याच्याकडून १४ लाख रुपये रोख आणि २ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच हलखेडा येथील राजकिसन जोगिंदर भोसले, दया जोगिंदर भोसले, शिवकिसन जोगिंदर भोसले, आक्काबाई जोगिंदर भोसले आणि जोगिंदर राजवंती भोसले यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गांझी दरियासिंग भोसले (रा. हलखेडा जुने) याच्यावर कारवाई करण्यात आली असून, त्याच्याकडून हरणाचे कातडे, कोल्ह्याचे कातडे आणि सशाचे कातडे जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत एकूण २० लाख रुपयांची रोख रक्कम, सुमारे ३० लाख रुपयांचे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ८ लाख रुपयांचे ४ किलो चांदीचे दागिने, दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे, वन्यजीव अवशेष, चार चारचाकी वाहने, सहा दुचाकी वाहने आणि ३० मोबाईल फोन असा मोठा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
यांनी केली कारवाई
या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ तथा मुक्ताईनगरचे प्रभारी अधिकारी केदार बारबोले, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, राहुल वाघ, आशिष लव्हांगळे, विशाल पाटील, योगिता नारखेडे, मीरा देशमुख, अमित कुमार बागुल यांच्यासह सुमारे २०० पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. अल्प लोकसंख्या असलेल्या गावांमधून संघटित पद्धतीने होणाऱ्या फसवणूक आणि गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कायद्याचा धाक निर्माण करून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



