
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात गुटखा माफियांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई सुरू असतानाच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात मात्र अवैध गुटखा व्यवसाय पुन्हा चर्चेत आला आहे. गुटखा तस्करांवर मोक्का (MCOCA) सारख्या कठोर कायद्याचा वापर होत असतानाही मुक्ताईनगर परिसरात गुटख्याची विक्री, साठवणूक आणि वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची आवक होत असल्याची चर्चा आहे. रात्रीच्या वेळेसच नव्हे तर दिवसाढवळ्याही गुटख्याची वाहतूक होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, या प्रकारामुळे संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गुटखा साठ्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जात आहे. अनेक गुटखा विक्रेत्यांवर कठोर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मात्र मुक्ताईनगरमध्ये गुटखा माफियांचे वाढते धाडस पाहता त्यांना कायद्याचा धाक राहिला आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील काही भागांमध्ये गुटखा विक्रीचे अड्डे सुरू असल्याची चर्चा असून, यामुळे युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. गुटख्यासारख्या प्रतिबंधित पदार्थामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतानाही हा व्यवसाय सुरू असल्याने प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर गुटखा माफियांविरोधात कठोर भूमिका घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे मुक्ताईनगरातील नागरिकांनाही या भागात प्रभावी कारवाई होण्याची अपेक्षा होती. मात्र अद्याप परिस्थितीत मोठा बदल दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी प्रकरणाची दखल घेत “योग्य ती कारवाई करण्यात येईल” असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता मुक्ताईनगर तालुक्यातील गुटखा माफियांविरोधात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे की, मोक्कासारख्या कठोर कायद्याची भीती गुटखा माफियांना राहिली नाही का? गुटख्याची मोठ्या प्रमाणात होणारी आवक नेमकी कोणाच्या पाठबळावर सुरू आहे? संबंधित विभागांच्या नजरेसमोर सुरू असलेल्या या अवैध व्यवसायावर प्रभावी कारवाई का होत नाही? युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या व्यवसायाला अभय कोणाचे, असा सवालही उपस्थित होत आहे. मुक्ताईनगरकरांची मागणी आहे की, गुटखा माफियांविरोधात तातडीने धडक मोहीम राबवून अवैध व्यवसायाला आळा घालण्यात यावा. अन्यथा मुक्ताईनगरला लागलेला “गुटख्याचे माहेरघर” असा शिक्का पुसणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.



