
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवैध धंदे चालकांकडून शहरात झालेल्या गोळीबाराच्या दोन गंभीर घटनांमुळे जळगाव पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते १२ पर्यंत जिल्हा पोलिसांनी विशेष ‘ऑपरेशन’ राबवून शांतता भंग करणाऱ्यांसह संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक आणि कायदेशीर कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ ते साडेबारा वाजेदरम्यान एमआयडीसी, जिल्हापेठ, शनिपेठ, शहर आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संबंधित अंमलदार, क्यूआरटी आणि आरएसपीच्या पथकांनी हे विशेष ऑपरेशन राबविले.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामेश्र्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, तुकारामवाडी, तांबापुरा आणि कंजरवाडा या संवेदनशील भागातील ७ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. शनिपेठ पोलीस या हद्दीतील कांचनगर, विठ्ठलपेठ, डॉ. आंबेडकरनगर, गोपाळपुरा, कोळीपेठ, मेस्कोमाता नगर, गुरुनानक नगर, शनिपेठ, गवळीवाडा, दाळफळ, तळेले कॉलनी आणि शंकर आप्पा नगर येथील १४ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर ४ जणांविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई झाली. तसेच दुसरीकडे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी नगर, गेंदालाल मिल, राजमालती नगर, शाहूनगर या भागांत कारवाई करताना एस. के. ऑईल मिलसमोर अवैध देशी दारू विकणाऱ्या एका इसमाकडून दारू जप्त करण्यात आली.
या विशेष ऑपरेशनमध्ये २७ हून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे अलर्ट असून, अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



