जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एलसीबीचे तत्कालीन प्रमुख बकाले यांच्या पाठोपाठ जिल्हा पोलीस दलातील एका सहायक फौजदाराला निलंबीत करण्यात आले आहे.
एलसीबीचे तत्कालीन प्रमुख किरणकुमार बकाले हे आक्षापार्ह टिपण्णीमुळे गोत्यात आले असून त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईसह ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. बकाले यांच्यामुळे जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा खालावली असतांना पुन्हा एका सहायक फौजदाराला निलंबीत करण्यात आले आहे. त्याच्यावर चक्क तमाशातील फडात नाचण्याचा आरोप आहे हे विशेष !
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी भटू विरभान नेरकर या सहायक फौजदाराला निलंबीत केले आहे. गेल्या महिन्यात निवृत्तीनगरात झालेल्या भावेश पाटील या तरूणाच्या खुनाने जळगाव हादरले होते. या प्रकरणी खेडी खुर्द येथील भूषण रघुनाथ सपकाळे आणि आव्हाणे येथील मनीष नरेंद्र पाटील या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील भूषण सपकाळे याच्या गावातील तमाशात सहायक फौजदार भटू नेरकर हा आपल्या एका सहकार्यासह नाचला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. याच व्हिडीओत भूषण सपकाळे हा देखील नाचत असल्याचे दिसून आले होते.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी याची चौकशी लावली होती. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर भटू विरभान नेरकर यांना निलंबीत करण्यात आले असून याच प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेल्या दुसर्या कर्मचार्याची देखील कसून चौकशी सुरू आहे. यामुळे बकालेंच्या पाठोपाठ पुन्हा एका पोलीस अधिकार्याला निलंबीत करण्यात आले आहे.