सिमीवरील बंदीसाठी महत्त्वपूर्ण ठरला होता जळगाव पोलिसांचा गोपनीय अहवाल

0
शेअर करा !

केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘स्टुंडट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’अर्थात सिमी या दहशतवादी संघटनेवर आणखी पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय गुरुवारी घेतला. सिमीवर १ फेब्रुवारी २०१४ रोजी बेकायदा कृती प्रतिबंधक अधिनियमाखाली पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या बंदीचा कालावधी ३१ जानेवारी २०१९ रोजी संपला होता. मुळात सिमी संघटनेवरील बंदीचे संपूर्ण श्रेय जळगाव जिल्ह्यातील पोलिसांचे आहे, हे फार कमी लोकांना माहित असेल. जळगाव जिल्ह्यातील सिमीचे जाळे उद्ध्वस्त केल्यानंतर जळगाव पोलिसांनी सिमी संघटनेवर बंदी घालण्यात यावी म्हणून एक गोपनीय अहवाल तयार केला होता. हा अहवाल नाशिक, मुंबई आणि त्यानंतर थेट संसदेत पोहचला होता. या अहवालाच्या आधारेच तत्कालीन गृहमंत्र्यांनी सिमीवर बंदी घालत असल्याचे संसदेत जाहीर केले होते.

 

जळगाव पोलिसांनी पाठवलेल्या मूळ अहवालात संसदेत पोहचेपर्यंत काय बदल झाले असतील, ते अद्यापही स्पष्टपणे सांगता येणार नाही. परंतु मूळ अहवालात पुढे नमूद केलेल्या पद्धतीचे मुद्दे साधारणपणे समाविष्ट करण्यात आले होते. हा गोपनीय अहवाल मूळ इंग्रजी भाषेत होता. मुळात जळगाव पोलिसांच्या याच गोपनीय अहवालामुळेच ‘सिमी’वर त्याकाळात बंदी घालले शक्य झाले होते. जळगाव पोलिसांनी हा अहवाल तयार करण्यासाठी रात्रंदिवस एक केल्यामुळे त्यातून अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला होता. हा संपूर्ण अहवाल ‘लाइव्ह ट्रेंड्स’ खास आपल्या वाचकांसाठी या ठिकाणी प्रसिद्ध करत आहोत.

 

सिमीवरील बंदीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेला जळगाव पोलिसांचा गोपनीय अहवाल 

सिमी आणि हिजबुल मुजाहिदीन संघटनेच्या जळगाव जिल्ह्यातील कारवाया

 

प्राथमिक माहिती :

जळगाव जिल्ह्यात मुस्लीम समुदायाची लक्षणीय लोकसंख्या असून येथे तबलिगी जमात, जमात-ए-इस्लामी आदींसारख्या मूलतत्त्ववादी संघटनांचे प्रस्थ आहे. १९९३ साली मुंबई येथे झालेल्या बॉंबस्फोटातील एक आरोपी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे आढळून आला होता. याचप्रमाणे १९८० पासून जळगाव जिल्ह्यात ‘सिमी’ या संघटनेची पाळेमुळे मजबूत असल्याचे दिसून आले आहे. विशेष करून बाबरी मशिदीच्या पतनाच्या दिवसाला ‘काळा दिवस’ मानत या संघटनेने निदर्शने केली होती, तसेच बकरी ईदच्या दिवशीही तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. याच पद्धतीने २००१ साली सिमी संघटनेने पवित्र ‘कुरआन शरीफ’ जाळण्याच्या कथित मुद्द्यावरून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता. साधारणपणे १९९७ पासून जळगाव जिल्ह्यात सिमीच्या कारवायांमध्ये वाढ झाली. या वर्षी सिमीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरुद्ध जळगाव जिल्ह्यातील नऊ विविध पोलीस स्थानकांमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने धार्मिक बाबीवरून दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणे (भा.दं.वि. १५३ अ), तसेच अन्य धर्मियांच्या भावना दुखावत व त्यांच्या आस्थेवर आघात करत तणाव निर्माण करणे (भा.दं.वि.२९५ अ) आदींचा समावेश होता; तर जळगावातील अक्सा मशिदीच्या परिसरात मुस्लीम तरुणांची माथी भडकावत त्यांना जिहादसाठी प्रेरित करण्याचा आणि त्यांना मूलतत्त्ववादाकडे नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे १९९८ साली उघड झाले होते. आपल्या समुदायातील तरुणांनी सिमीच्या इस्तेमामध्ये सहभागी होऊन जिहादमध्ये सहभागी होत बाबरी मशिदीच्या पतनाचा बदला घेण्यासाठी प्रेरित करण्याच्या कारवायादेखील निदर्शनास आल्या होत्या.
रिझवानच्या चौकशीत त्याने खालीद असद आणि शेख सिद्दीक हे आपले सहकारी जळगाव, भुसावळ, औरंगाबाद आदी शहरांमध्ये सिमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या इस्तेमांमध्ये नियमितपणे हजेरी लावत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. याच माहितीच्या आधारे खालिद असद याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली होती. दरम्यान, औरंगाबाद येथील विवेकानंद महाविद्यालयात बी.एस्सी.चे (इलेक्ट्रॉनिक्स) शिक्षण घेणार्‍या शेख सिद्दीकला ताब्यात घेण्यात आले. यात त्याने पुढीलप्रमाणे माहिती दिली.

जिहादचा परिचय

१) खालिद असद हा सिमीच्या कारवायांना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी ग्रुप लीडरचे काम करत होता. तो ‘आमीर’ अथवा ‘रिंगलीडर’ या नावाने ख्यात असल्याने चौकशीसाठी सर्वप्रथम त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या सखोल चौकशीत असे आढळून आले की, त्याने रायगड जिल्ह्यातील म्हसाळा येथील डी.एड. कॉलेजमधून डी.एड.चे शिक्षण पूर्ण केले होते. येथे तो जुलै १९९८ ते जून २००० दरम्यान विद्यार्थी म्हणून शिकत होता.

२) रायगड जिल्ह्यातून परत आल्यानंतर तो बेरोजगार असल्यामुळे निरुद्देशपणे भटकू लागला होता. अक्सा मशिदीत तो दिवसातून दोन वेळा नमाज पठण करत असे. यानंतर अन्य तरुणांप्रमाणे तो सिमीच्या जळगाव शाखेचा अध्यक्ष अंसार शकील हन्नान याच्या प्रभावाखाली आला. जरी त्याने सुरुवातीला सिमीचे सदस्यत्व घेतले नसले, तरी त्याने यासाठी अर्ज करून सिमीच्या साप्ताहिक बैठकांना हजेरी लावण्यास प्रारंभ केला होता. सिमीचे पुढारी हे अक्सा मशिदीच्याच आवारात ‘कुरआन’ शिकवण्याचे काम करत असत. यात ते चतुराईने ‘कुरआन’ आणि ‘हदीस’ यांच्या कथांमध्ये दुसर्‍या घटना घुसडून तरुणांना जिहादमध्ये कार्यरत होण्यासाठी प्रेरित करत असत. काश्मीर, चेचन्या, पॅलेस्टाईन, इस्त्राईल आणि जगातल्या अन्य भागांमधील मुस्लीम समुदायावर होत असलेल्या अत्याचारांच्या कहाण्या सांगून ते तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत असत.

३) याचसोबत बाबरी मशिदीच्या पतनासह मुस्लीम समुदायावरील कथित अत्याचारांच्या अतिरंजित कहाण्या सांगून तरुणांना भडकावत याचा बदला घेण्यासाठी प्रेरित करण्याचे कामही यात करण्यात येत असे. यात ते तरुणांना सशस्त्र संघर्षासाठी चिथावणी देत असत. शकील अब्दुल हन्नान, आसीफ खान व परवेज खान हे जळगाव शहराच्या शाखेचे तीन म्होरके तसेच अन्य अंसार हे प्रत्येक रविवारी अक्सा मशिदीच्या आवारात तरुणांसमोर भाषण देत असत. यात ते हिंदू तसेच संपूर्ण भारतीय समाजाविरुद्ध संघर्ष करण्याची आवश्यकता सांगत असत. यात ते काश्मीरातील मुस्लिमांवरील भारतीय सैन्याच्या कथित अत्याचारांच्या अतिरंजित कहाण्यांचाही आधार घेत असत.

४) दरम्यानच्या कालखंडात भुसावळ आणि औरंगाबाद येथे नियमितपणे होणार्‍या सिमीच्या इस्तेमांमध्ये अनेक कट्टरपंथी नेते तरुणांना भडकावणार्‍या भाषणांनी चिथावणी देत असत. तर या काळात अक्सा मशीदीच्या आवारातील सिमीच्या साप्ताहिक बैठका नियमितपणे होऊ लागल्या होत्या.

सी.टी.एस.चा (दिल्ली) इस्तेमा आणि हासिब रजासोबतच्या बैठकी

१) प्रत्येक वर्षी सिमी संघटनेतर्फे दिल्ली येथील ‘सेंट्रल ट्रेनिंग स्कूल’ अर्थात ‘सी.टी.एस.’ येथे वार्षिक इस्तेमाचे आयोजन करण्यात येत असे. यात फक्त सिमी संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे शिफारस करण्यात आलेल्या सदस्यांनाच भाग घेता येत असे. यामुळे यात देशभरातून अवघ्या १५०च्या आसपास इतके निवडक सदस्यच या इस्तेमात सहभागी होत असत. यातूनच काश्मीरातील जिहादमध्ये सहभागी होणार्‍यांची भरती करण्यात येत असे.

२) या अनुषंगाने २००० सालच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या सिमीच्या वार्षिक इस्तेमात सिमीच्या जळगाव शहर शाखेचा अध्यक्ष शकील अब्दुल हन्नान याने आठ तरुणांची निवड केली. यात १) खालिद असद खान अजमल खान (वय २२, बेरोजगार) २) शेख सिद्दीक शेख अजीज (वय २१, विद्यार्थी) ३) शरीफ खान सर्फराज खान (वय २३, बेरोजगार) ४) शेख इलियास शेख युसुफ (वय १९, विद्यार्थी) ५) मुश्ताक शेख शफी (वय १९, मिस्तरी कामगार) ६) आसीफ शेख सुपडू (वय २२, विद्यार्थी) ७) खालीद शेख इकबाल (वय २१, विद्यार्थी) ८) शेख हनीफ (वय २१, मेकॅनिक) यांची सी.टी.एस.च्या मुख्य इस्तेमात सहभागी होण्याची शिफारस करण्यात आली होती. यासाठी लागणारा खर्च सिमी संघटनेतर्फे करण्यात आला होता.

३) हा वार्षिक इस्तेमा एक आठवड्याच्या कालावधीत चालला. यात सिमी संघटनेने विशेष करून माजी अंसारांचा समावेश असणार्‍या प्रेरणास्त्रोतांना बोलावले व त्यांनी तरुणांना जिहादमध्ये सहभागी होण्याची चिथावणी देणारी भाषणे केली. विशेष म्हणजे यात सहभागी तरुणांना पाटना शहरातल्या फुलबारी शरीफ येथील रहिवासी असणार्‍या हसीब रजा याला भेटण्याची संधी मिळाली. रजा हा माजी अंसार असून सिमी आणि हिजबुल मुजाहिदीन यांच्यातील प्रमुख दुवा होता. हा इसम तरुणांना काश्मीरात घेऊन जात असे. तसेच तो तरुणांना काश्मीरातील डोडा भागातल्या दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांची माहितीदेखील देत असे.

४) या आठ जणांमधील आसीफ शेख सुपडू याचा अपवाद वगळता सर्व जण जळगावला परत आले. ते सर्व जण जिहादमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित झाले होते. तर आसीफ शेख सुपडू हा काही दिवसांनंतर जळगावला परतला. या वेळी त्याने आपण काश्मीरात सुरू असणार्‍या जिहादमध्ये सहभागी होण्यासाठी जात असल्याचे सांगत त्या अन्य तरुणांनाही सोबत येण्याची गळ घातली. प्राप्त माहितीनुसार तो काश्मीरात जाण्याचे निश्‍चित करण्याआधी दिल्ली येथे काही दिवस थांबला होता. तसेच त्याने अन्य तरुणांना पाटना येथील हसीब रजा याच्या घरी नेण्यापर्यंत याबाबत उलगडादेखील केला नव्हता. ही मुले पाटना येथे जाण्यापूर्वीच आसीफ अगोदरच तेथे पोहचला होता.

काश्मीरला प्रयाण व प्रशिक्षण

१) सप्टेंबर २००० या महिन्यात शेफ आसीफ शेख सुपडू याने पाटना येथे जाऊन काश्मीरयात्रेची पूर्वतयारी केली. त्याच्याकडून दूरध्वनीवरून माहिती घेऊन शेख खालिद, हनीफ, रिझवान, सिद्दीक आणि खालिद शेख इकबाल यांनी ४ सप्टेंबर २००० रोजी कुर्ला-हावडा एक्सप्रेसने पाटना येथे प्रयाण केले. येथे या सर्व सहा जणांनी सिमी संघटनेच्या एक्झीबिशन रोडवर असणार्‍या कार्यालयात वास्तव्य केले. यानंतर त्यांनी हसीब रजा याची (दूरध्वनी क्रमांक २५५२**) त्याच्या घरी भेट घेतली. रजा याने त्यांनी डोडा येथील अस्थाना मशिदीत राहणार्‍या फिदा हुसेन याला भेटण्याचे सूचित केले. हा संदर्भ फक्त आसीफला सांगण्यात आला होता.

२) हे सहा तरुण ७ सप्टेंबर २००० रोजी हिमसागर एक्सप्रेसने जम्मू येथे गेले. ८ सप्टेंबर रोजी जम्मू येथे पोहचल्यानंतर ते एक दिवस बस स्थानक परिसरातील एका लॉजमध्ये थांबले. दुसर्‍या दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करून त्यांनी डोडा गाठत तेथील ‘हॉटेल ड्रिमलँड इंटरनॅशनल’ येथे वास्तव्य केले.

३) आसीफ शेख व रिझवान यांनी मास्टर फिदा हुसेन याच्याशी संपर्क साधला असता त्याने मुल्ला या दुसर्‍या व्यक्तीला भेटायला सांगितले. येथे मुल्लाच्या सांगण्यानुसार या तरुणांचे दोन गट करण्यात आले. यांतील रिझवान, आसीफ शेख आणि खालिद इकबाल यांच्या गटासोबत डोडा शहराजवळ असणार्‍या बाबूर गावात मुल्ला गेला. बाबूरपासून सुमारे एक कि.मी.चा रात्रीचा पायी प्रवास केल्यानंतर १४ सप्टेंबर रोजी या तरुणांना एका खेड्याजवळ मुजाहिदीनांच्या सुपुर्द करण्यात आले. मात्र या वेळी रिझवान आजारी पडल्यामुळे तो मुल्लासोबत परत आला. यानंतर तो जळगावला १८ सप्टेंबर २००० रोजी परतला.

४) यानंतर सिद्दीक, शेख खालिद आणि हनीफ खान यांचा समावेश असणार्‍या दुसर्‍या ग्रुपलाही मुल्लाने डोडा शहराच्या परिसरातील डोंगराळ भागात असणार्‍या खेड्यात मुजाहिदीनांच्या स्वाधीन केले. येथे ते पहिल्या ग्रुपमधील तरुणांना भेटले.

५) यानंतर या तरुणांना श्रीनगर येथील लाल चौकाच्या परिसरात असणार्‍या नीलम लॉजमध्ये थांबण्याचे निर्देश देण्यात आले. येथे मुजाहिदींनी दुसरा गट पुढील कामासाठी घेऊन जाणे अपेक्षित होते. मात्र कुणीही त्यांच्याशी संपर्क साधला नाही, तसेच त्यांना कुणी घेऊनही गेले नाही. यामुळे हे सर्व तरुण पुन्हा डोडा येथे परतले. तेथे मास्टर फिदा हुसेन याने त्यांना नियंत्रण रेषेकडे (एल.ओ.सी.) पाठविण्याची व्यवस्था केली. हे तरुण सुमारे सात दिवसांपर्यंत सातत्याने पायी चालत होते. मात्र थकल्यामुळे त्यांनी पुढे जाण्यास नकार दिल्यामुळे त्यांना श्रीनगर येथे परत पाठविण्यात आले. यानंतर त्यांना परिसरातील खेड्यांमध्ये अँबेसेडर कारमधून फिरवण्यात आले.

६) यानंतर या पाचही जणांना कुपवाडा येथे नेण्यात आले. येथे त्यांना दोन गटांमध्ये मुजाहिदीनांच्या स्वाधीन करण्यात आले. यातील एका गटामध्ये खालिद इकबाल, हनीफ आणि शेख आसीफ सुपडूचा समावेश होता. त्यांना अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. तर खालिद असद आणि सिद्दीक हे कुपवाडाभोवतालची खेडी आणि जंगलांमध्ये विहार करत राहिले. सुमारे अडीच ते तीन महिन्यांनंतर ते श्रीनगरला परतले. दरम्यानच्या कालखंडात त्यांनी प्रत्यक्षात एल.ओ.सी. पार केली की नाही? याची माहिती ते देऊ शकले नाहीत. डोंगराळ परिसरामुळे त्यांना आपण नेमके कुठे आहोत, याचे आकलन झाले नाही. यामुळे त्यांनी केलेला दावा हा सत्य असू शकतो.

७) या कालखंडात सर्व तरुणांना शस्त्र तसेच ग्रेनेड हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे ते अगदी एके४७ सारख्या घातक शस्त्रांना चालवण्यात पारंगत झाले. या प्रशिक्षणात स्फोटकांना हाताळणे अथवा ‘आय.डी.ई.’ची (टाईम बॉंब) जोडणी करण्याचे ज्ञान आपल्याला देण्यात आले नसल्याचा दावा या तरुणांनी केला. तथापि, नागपूर येथे ‘आय.डी.ई.’ प्लांट केल्याची घटना पाहता या तरुणांना स्फोटके आणि आयडीईच्या हाताळणीची बर्‍यापैकी माहिती असल्याचा निष्कर्ष आपण काढू शकतो.

८) नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुपवाडानजीकच्या वास्तव्यात यातील तीन तरुण भारतीय सुरक्षा यंत्रणांसोबतच्या चकमकीत ठार झाल्याची माहिती दोन तरुणांनी दिली. या तिन्ही तरुणांना डोरसा या खेड्यात दफन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

अशरफ बेगची माहिती

१) खालिद असद आणि शेख सिद्दीक यांना डोंगराळ भागात काम करण्यात अडथळा येत असल्याचे पाहून त्यांना श्रीनगरमार्गे जळगावला परत पाठविण्यात आले.
२) श्रीनगरमध्ये त्यांना अशरफ बेग मुनीर बेग हा सिमीचा कार्यकर्ता भेटला. त्याने या दोघांना दहा हजार रूपये देत ९८१०००७*** हा संपर्कासाठी क्रमांक दिला. खालिद याने जळगाव येथे जाऊन या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अशरफने सूचित केले. यानंतर हे दोन्ही तरुण टॅक्सीने जम्मू येथे गेले. ते २०००च्या रमजान महिना सुरू होण्याच्या सुमारे एक आठवड्याआधी जळगावला पोहचले.
३) अशरफ बेग हा या दोघांच्या संपर्कात राहून त्यांना कारवाया करण्यासाठी चिथावणी देण्यास कारणीभूत ठरला. जळगाव येथे हे तरुण असताना मुख्यत्वे खालिदच्या माध्यमातून त्याने हे काम केले. याशिवाय त्याने नागपूर येथे आढळून आलेले ‘आय.ई.डी.’ व अन्य स्फोटके पुरविण्याचे कामही केले.

जळगाव वापसी आणि कारवाया

१) जळगाव येथे परतल्यानंतर खालिद असद याने ज्या पद्धतीने काम केले, ते पाहता तो ‘हिजबुल मुजाहिदीन’ या संघटनेचा नियमित सदस्य असल्याचे अधोरेखित झाले. तसेच जळगाव येथील तरुण आणि हिजबुलमध्ये समन्वय ठेवण्यासाठी त्याची नियुक्ती करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. तर रिझवानसुद्धा नियमित सदस्य असल्याचे दिसून आले. तो स्थानिक पातळीवर अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याचे काम करत होता. यासाठी त्याने जनता सहकारी बँकेच्या नवी पेठ शाखेत २०२१** या क्रमांकाचे खाते उघडले होते. यात त्याने अशरफ बेगकडून पाठविण्यात आलेल्या पैशांवर व्यवहार केले. या खात्यातील विविध व्यवहारांमध्ये सुमारे २५००० रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले.

२) शेख सिद्दीक हा जळगावला परतल्यानंतर त्याच्या वडलांना तो काश्मीरात गेल्याचे माहीत झाले. यामुळे त्यांनी सिद्दीकला पुढील शिक्षण घेण्यासाठी तातडीने औरंगाबादला पाठविले. पुढील चौकशीत असे निष्पन्न झाले की, शेख सिद्दीक याने नागपूर येथील ‘आय.डी.ई.’ प्रकरणासह सिमी संघटनेच्या पुढील कोणत्याही कारवायांमध्ये भाग घेतला नाही.

३) खालिद असद हा हिजबुल संघटनेचा अत्यंत कट्टर तसेच सक्रिय सदस्य होता. याचसोबत तो सिमी, हिजबुल आणि या तरुणांमधील दुवा म्हणूनही काम पाहत होता. जळगाव येथे परतल्यानंतर त्याने तातडीने अन्य तरुणांशी संपर्क साधला. यात विशेष करून मुश्ताक, शरीफ, इरफान व इलियास या तरुणांना हिजबुल मुजाहिदीन संघटनेत सहभागी होण्यासाठी आग्रह धरला. यातील शरीफ या बेरोजगार तरुणाने तो आपल्या विधवा आईचा एकमेव आधार असल्याने माघार घेतली.

४) दरम्यान, खालिद असद याने दिल्ली येथील भेटीगाठी सुरूच ठेवल्या. बोलावणे आल्यानंतर तो अशरफ याला दिल्ली येथील जामा मशिदीत भेटून त्याच्या पुढील सुचनांची माहिती घेत असे. तो जामा मशिदीच्या परिसरात असणार्‍या बिल्ली महारन या लॉजमध्ये वास्तव्य करत असे.

५) सुमारे चार महिन्यांच्या कालखंडात खालिद असद याने चार वेळेस नवी दिल्लीला भेट दिली. यात एकदा निर्देश मिळाल्यानुसार तो रिझवान व इरफान यांना घेऊन स्फोटके व अन्य सामग्री घेण्यासाठी नवी दिल्लीत गेला. त्यांना ही सामग्री जामा मशिदीत मिळणार होती. मात्र दोन दिवस वाट पाहूनही अशरफ बेग या तिन्ही तरूणांना सामग्री देण्यासाठी आला नाही.

६) अंदाजे फेब्रुवारी महिन्यात अशरफ मुनीर बेग हा हैद्राबाद आणि वारंगळमार्गे जळगावला आला. येथे तो जीएस मैदानावर खालिद, रिझवान आणि इरफान यांना भेटला. येथे त्याने या तिघांना पुन्हा एकदा जिहादसाठी प्रेरित केले. या भेटीत अशरफने स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार करण्यावर विशेष भर दिला. यासाठी त्याने खालिद असद याला १८,००० रुपये देखील दिले.

७) या पैशांमधून रिझवानच्या निवासस्थानी त्याचे वडील शेख रशीद शेख चांद यांच्या नावे २४१६** या क्रमांकाचा टेलिफोन घेण्यात आला. तर उर्वरित पैसे हे वर नमूद केलेल्या बँक खात्यात जमा करण्यात आले. वेळोवेळीचा खर्च भागवण्यासाठी याचा विनियोग करण्यात आला.

८) या भेटीत अशरफ याने इरफानकडून जळगाव जिल्ह्यात असणार्‍या आयुध निर्माणीबाबत (ऑर्डनन्स फॅक्टरी) माहिती जाणून घेतली. यात त्याला वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीबाबत माहिती देण्यात आली. मात्र अशरफ याने संबंधित ऑर्डनन्स फॅक्टरीला भेट दिली अथवा नाही, या माहितीची पुष्टी करण्यात आली नाही.

स्फोटकांची सामग्री मिळाली

१) मे २००१च्या पहिल्या आठवड्यात अशरफ मुनीर बेग याने खालिद याला पुन्हा दिल्लीस बोलावून घेतले. जामा मशिद परिसरात झालेल्या या भेटीत त्याने स्फोटकांसाठीची विशिष्ट पावडर (आटा), ऑईल, सहा डिटोनेटर्स, दोन टायमर आणि एका रिमोट कंट्रोलला खालिदकडे सुपुर्द केले. याशिवाय त्याने इलेक्ट्रीक फ्युज वायरही दिली.

२) ही सर्व सामग्री रिझवानच्या घरात ठेवण्यात आली. यानंतर खालिदच्या मामाच्या घरात याच्या जोडणीचे काम करण्यात आले.

आय.ई.डी.ची जोडणी व पूर्वतयारी

१) आय.ई.डी.च्या जोडणीसाठी खालिदने इरफान आणि रिझवान यांच्या माध्यमातून पाईप व चायनीज बॅटरीजची खरेदी केली. यातील एक पाईप हा बोहरी गल्लीतल्या संघवी पाईप येथून तर दुसरा एका भंगार विक्रेत्याकडून खरेदी करण्यात आला होता. चायनीज बॅटरी ही गोलाणी मार्केटमधील ‘विजय टाइम्स’ या दुकानातून विकत घेण्यात आली होती. या दोन्ही विक्रेत्यांनी याबाबत कोणतीही नोंद ठेवली नसून त्यांना बिलेदेखील दिली नव्हती. तर छर्रे हे इलियासच्या माध्यमातून पोलन पेठेतील धुलिया सायकल मार्ट येथून विकत घेण्यात आले होते. या जळगावमधील सर्व विक्रेत्यांनी संबंधितांना वस्तूंची विक्री केल्याची माहिती पोलिसांना दिलेल्या जबानीत दिली आहे.

२) इरफानने या सर्व उपकरणांची वेल्डींग ही त्याच्या मालकीच्या ‘शालिमार ट्रेडर्स’ तसेच दुसर्‍या ओळखीच्या व्यक्तीच्या मालकीच्या ‘ओम नम: शिवाय एंटरप्रायजेस, जळगाव’ या दुकानात केली. या संदर्भात ही वेल्डींग करताना पाहणार्‍या, ओम एंटरप्रायजेसमध्ये काम करणार्‍या नोकराने पोलिसांसमोर भादंवि कलम १६४च्या अन्वये दिलेला जबाब नोंदविला आहे.

३) मे २००१च्या दुसर्‍या आठवड्याच्या शेवटी खालिदने रिझवान, इरफान, मुश्ताक आणि इलियास यांना त्याचे मामा शेख जैनुद्दीन शेख अमिनुद्दीन याच्या इकबाल कॉलनी, मेहरुण, जळगाव येथील भाड्याच्या घरात आय.ई.डी.ची जोडणी करण्यासाठी बोलाविले. या वेळी शेख जैनुद्दीन हा जामनेर येथे आपल्या भावाच्या विवाहासाठी गेला होता. त्याने आपल्या घराच्या किल्ल्या खालिद असद याच्या वडलांकडे दिल्या होत्या.

४) आय.ई.डी.ची जोडणी केल्यानंतर हे आय.ई.डी. शालिमार ट्रेडर्सच्या आवारात ठेवण्यात आले होते. यानंतर एका दिवसाने हे आय.ई.डी. शालिमार ट्रेडर्सच्या जुन्या जागेत नेण्यात आले. येथे इरफानने २० मे २००१ रोजी ४.०० वाजता त्यांना नागपूरला नेण्यासाठी खालिदला सुपुर्द केले.

 

नागपूर येथे आय.ई.डी.पेरले

१) त्याच दिवशी म्हणजे २० मे २००१ रोजी खालीद असद आणि इरफान हे आय.ई.डीं.सह कुर्ला-हावडा एक्सप्रेसने नागपूरला जाण्यासाठी निघाले. ते सुमारे १५.३० वाजता नागपूरला पोहचले. या परिसराची पाहणी करताना हेरून ठेवलेल्या हॉटेलमध्येच या दोघांनी जेवण केले. या हॉटेलच्या मालकाला त्यांनी आय.डी.ई. भरलेली पिशवी थोड्या वेळासाठी सांभाळून ठेवण्याची विनंती केली. त्याने ती मान्य केल्यामुळे या दोघांनी महाल एरिया या भागात सायकल रिक्षाने फेरी मारून पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी या भागाचे नकाशासह अध्ययन केले.

२) सुमारे १८.३० वाजता संबंधित हॉटेलमधून पिशवी घेऊन झेंडा चौकाजवळ असणार्‍या बडकस चौकात त्यांनी आय.ई.डी. पेरले. यासाठी ते दोन वेगवेगळ्या दिशांनी गेले आणि नंतर ते सेवाग्राम एक्सप्रेसने जळगावकडे परतीच्या प्रवासाला निघाले.

३) जळगाव ते नागपूर आणि नागपूर ते जळगाव या प्रवासासाठी रिझवानने केलेल्या आरक्षणासाठीच्या सादर केलेल्या पावत्या जप्त करण्यात आल्या असून त्यावरील हस्ताक्षरांची ओळख पटविण्यासाठी त्या पाठविण्यात आल्या आहेत. या दोघांनी दुसर्‍यांच्या नावाने तिकिटांचे आरक्षण केले होते.

टार्गेटची निवड

१) खालिद असद आणि रिझवान यांनी नागपुरातील अत्यंत संवेदनशील अशा ठिकाणांवर आय.ई.डी. पेरून ठेवले होते. यात विश्‍व हिंदू परिषदेचे कार्यालय आणि बडकस चौकाचा समावेश होता. यामुळे असदला त्याचा म्होरक्या अशरफ याने आय.ई.डी. ठेवण्यासाठी काही विशेष निर्देश दिले होते का? याबाबत चौकशीत विचारणा करण्यात आली.

२) खालिदने दिलेल्या माहितीनुसार त्याला नागपुरातल्या महल परिसरातील कोणत्याही भागामध्ये आय.ई.डी. ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र ही माहिती संशयास्पद वाटते. कारण शरिफ आणि खालिद यांनी काळजीपूर्वक विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यालयाची बॉंब पेरण्यासाठी निवड केल्याचे दिसून आले होते. दुसरी बाब म्हणजे बॉंबची पेरणी करण्याआधी खालिद असद हा त्या भागाची तोंडओळख व्हावी म्हणून १४ मे २००१ रोजी नागपूर येथे गेल्याची माहिती नंतर समोर आली होती. यामुळे तो टार्गेटची निवड करण्यासाठीच नागपूरला गेल्याचे सिद्ध झाले आहे.

३) खालिदने १४ मे रोजी जळगावहून नागपूरला जाण्यासाठी सेवाग्राम एक्सप्रेस तर परतीच्या प्रवासासाठी विदर्भ एक्सप्रेसच्या अनारक्षित तिकिटाने प्रवास केला असल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या रेकॉर्डनुसार त्याच्या या प्रवासाची पडताळणी झाली नाही.

नवी दिल्लीतील एमसीएस इन्फोटोकमध्ये प्रवेश

१) जून २००१च्या पहिल्या आठवड्यात अशरफ मुनीर बेग याने खालीस असद याला दिल्लीला बोलावून घेत त्याला ए.डब्ल्यू.झेड.-६१, ए/३सी, वसिष्ठ पार्क, नवी दिल्ली येथील एमसीएस इन्फोटेक या संस्थेत विद्यार्थी म्हणून प्रवेश घेण्याची सूचना केली.

२) या संस्थेत त्याला १ ऑगस्ट २००१ रोजी दाखल व्हायचे होते. यासाठी खालीदने ३१ जुलै २००१ रोजीच्या कर्नाटक एक्सप्रेसने प्रवासाचे आरक्षण केले होते. या प्रवेशाच्या माध्यमातून त्याच्या दिल्लीतील वास्तव्यासाठी एक सबळ कारण निवडण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र तो जळगावातल्या सिमी आणि हिजबुल या संघटनांच्या समन्वयाचे काम करणार होता. या प्रवासासाठी खालिदने काढलेले रेल्वे तिकिट जप्त करण्यात आले आहे.

पुरावे नष्ट करणे

१) खालिद, रिझवान, इरफान आणि इलियास यांनी पाईप बॉंबची जोडणी केल्यानंतर उर्वरित न वापरण्यात आलेला आटा, तीन डिटोनेटर्स, ऑईल, फ्युज वायर आणि एक टायमर उपकरण हे सुरक्षित ठेवण्यासाठी मुश्ताकला दिले. त्याने ते आपल्या घरात लपवून ठेवले. मात्र २६ जुलै २००१ रोजी खालिद आणि रिझवान यांना अटक झाल्यानंतर मुश्ताकने संभाव्य धोका लक्षात घेत इलियासच्या मदतीने घरातील स्फोटकांसह अन्य सामग्री जमा करून ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

२) इलियासने पॉलिथीन बॅगेमध्ये आटा (स्फोटक पदार्थ) भरून तो एमआयडीसी परिसरातील एका विहिरीत फेकला. याशिवाय इलियासने या विहिरीपासून सुमारे ३०० मीटर अंतरावर तीन डिटोनेटर्स, टायमर उपकरण आणि बॅटरी नष्ट केली. तर मुश्ताकने घरात फ्युज वायर नष्ट करत ऑईल विहिरीत फेकून दिले. तसेच त्याने आपल्या घराच्या छतावर सुरुवातीला आट्याने भरलेली बॅग जाळून टाकली.

३) पुरावा नष्ट करण्याचे हे काम २६ आणि २७ जुलैच्या रात्री करण्यात आले. आटा, नष्ट करण्यात आलेली सामग्री, ऑईलमिश्रीत माती आणि राख तसेच जळलेली बॅग आदींना भारतीय पुरावा कायदा एस २७ नुसार घर झडतीदरम्यान पंचनामा करून जमा करण्यात आले.

सिमीची भूमिका

१) या सर्व प्रकरणात सर्व पुराव्यांनुसार मुस्लीम युवकांना जिहादमध्ये भाग घेण्यासाठी प्रेरित करण्यात सिमी संघटनेची महत्त्वाची भूमिका असल्याचे दिसून आले. यात जळगावातील मुख्य चिथावणी देणार्‍यांमध्ये सिमीच्या जळगाव शाखेचा अध्यक्ष शकील हन्नान, संघटनेचा अंसार तथा जळगावनिवासी परवेज खान, विद्यमान सचिव महाराष्ट्र झोन तथा जळगावनिवासी आसीफ खान, सिमीचा जळगाव जिल्हाध्यक्ष फिरोज खान गुलाब खान यांचा समावेश असल्याचे दिसून आले.

२) या सर्वांनी तरुणांना भरकटवण्यासाठी मेहरुण येथील अक्सा मशिदीच्या परिसराचा वापर केल्याचे दिसून आले.

३) संबंधित तरुणांना जगभरात मुस्लीमांवर होत असलेल्या कथित अत्याचारांबाबत चिथावणी दिली जात असे. यात काश्मीरातील मुस्लिमांवरील भारतीय सैन्याच्या कथित अत्याचांराचाही समावेश होता. कुख्यात दहशतवादी ओसामा बीन लादेन हा ‘मर्द-ए-मुजाहिदीन’ असल्याचे त्यांच्या मनावर बिंबवण्यात येत असे.

४) सिमी ही संघटना तरुणांना काश्मीरात जिहाद करण्यासाठी चिथावणी देत असल्याचेही सिद्ध झाले आहे. एकदा का या तरुणांचे ‘ब्रेनवॉश’ झाले की, त्यांना सिमीच्या बैठकींना उपस्थित राहू नये, असे सांगितले जात असे. यासोबत या तरुणांना त्यांच्या सिमीसोबतच्या संबंधांबाबत इतरांना माहिती न देण्याबाबतही बजावले जात असे.

५) तरुण काश्मीरात गेल्यानंतर त्यांच्या चिंताग्रस्त पालकांनी आपल्या मुलांची ख्याली-खुशाली विचारण्यासाठी सिमीच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता त्यांना याबाबत प्राथमिक माहिती दिली जात असे. विशेष म्हणजे या तरुणांच्या घरच्या अथवा त्यांनी दिलेल्या (पी.पी.) क्रमांकांवर सिमी कार्यकर्त्यांनी ‘कॉलर आयडी’ बसविल्याचेही दिसून आले.

६) मात्र काही तरुणांच्या पालकांचे यामुळे समाधान न झाल्यामुळे त्यांनी सिमीच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर दबाव आणला. या वेळी त्यांनी सिमीचा अखिल भारतीय सचिव वकारूल हसन याच्या माध्यमातून पालकांवर दबाव आणून त्यांना शांत राहण्यासाठी धमकावले. शकील हन्नान, वकारूल हसन आणि आसीफ खान या सिमीच्या पदाधिकार्‍यांनी तरुणांच्या पालकांना धमकावल्याची माहिती नंतर उघड झाली.

७) काश्मीरात मरण पावलेल्या तिन्ही तरुणांच्या वडलांनी यासाठी सिमीला जबाबदार धरले. त्यांनी या संदर्भात सिमीचे पदाधिकारी शकील हन्नान, वकारूल हसन आणि आसीफ खान यांनी आपल्याला गप्प बसविण्यासाठी धमकावल्याचा जबाब क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन १६४च्या अंतर्गत न्यायाधीशांच्या समोर दिला.

८) या तरुणांना शस्त्र हाताळणीचे चांगले प्रशिक्षण देण्यात आले होते. अशरफ बेग याच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तसेच नागपूर येथे घातपात घडविण्यासाठी जळगाव येथे हिजबुलचा बेस कँप तयार करण्याचे त्यांना सांगण्यात आले होते. नागपूर येथे पाईप बॉंब पेरण्यासाठी त्यांनी तरुणांना प्रशिक्षण दिले होते. मात्र या तरुणांना दुसरे अन्य कोणतेही टार्गेट देण्यात आले नव्हते. अशरफ याने या संदर्भात त्यांना कोणत्याही सूचना दिल्या नव्हत्या.

९) या तरुणांचे प्राथमिक व खरे लक्ष्य हे नागपूरच असल्याचे जवळपास सिद्ध झाले आहे. खालिद असद याला ऑगस्ट २००१च्या पहिल्या आठवड्यात दिल्ली येथील ‘एमसीएस इन्फोटेक’ या संस्थेत दाखल होण्याचे सुचविण्यात आले होते. यात त्याला महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी घातपात घडविण्यासाठी तसेच सिमी आणि अन्य तरुणांमधील दुवा बनण्याचे काम देण्यात येणार असल्याची बाब नंतर निष्पन्न झाली.

१०) सिमी संघटनेने मुस्लीम तरुणांची माथी भडकावत त्यांना जिहादमध्ये सहभागी होण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचे दिसून आले. यासाठी सिमीने विशेष करून टेक्निकल बाबींमध्ये शिक्षण घेणार्‍या तरुणांना हेरले होते. यातील खालिद असद हा संगणकसाक्षर होता. खालिद आणि रिझवान हे संपर्कासाठी ई-मेल वापरत असत.

११) सिमी संघटनेने जिहादी वृत्तीने प्रक्षुब्ध झालेल्या तरुणांना सामग्री तसेच अर्थसाहाय्य उपलब्ध केले. यात २००१च्या ‘कुरआन शरीफ’ जाळण्याच्या प्रकरणासह अन्य संवेदनशील घटनांमधून वातावरणात तणाव निर्मित करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच या घटनेच्या निषेधार्थ जळगावात निघालेल्या मोर्च्यातही या तरुणांनी उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले होते.

१२) जळगावच्या औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकात दहा जणांविरुद्ध इंडियन एक्सप्लोझीव्ह सबस्टन्सेस ऍक्ट १९०८च्या सेक्शन ३ व ४ तसेच भादंवि कलम १५३ अ, १२० ब, १२१, १२१ अ, १२२ आणि १२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. यात दहा जणांना अटक करण्यात आली असून आसीफ खान (रा. जळगाव), परवेज खान (रा. जळगाव) व हसीब रजा (रा. फुलवारी शरीफ पाटना) आणि अशरफ बेग यांना अटक करण्याचे बाकी आहे.

१३) अशरफ बेगला अटक करण्यासाठी जाळे लावण्यात आले. यानुसार त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. मात्र आसीफ खान, परवेज खान व अंसार हे भूमिगत झाल्यामुळे त्यांना अटक करणे अशक्य झाले. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून स्फोटके, फ्युज वायर, रिमोट कंट्रोल उपकरण आणि एक बॅटरी जप्त करण्यात आली.

हासिब रजाची भूमिका

१) हासिब रजा हा फुलवारी शरीफ पाटना येथील रहिवासी असून तो माजी अंसार आहे. तो सिमी संघटनेचे प्रेरणास्थान असणार्‍या प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. डोडा येथील रहिवासी मास्टर फिदा हुसेन याच्या माध्यमातून ‘हिजबुल मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असणार्‍यांपैकी एक महत्वाचा दुवा म्हणून तो काम करत असे. तो सिमी आणि हिजबुल संघटनेतील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत सिमीच्या माध्यमातून विविध दहशतवादी कृत्ये करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

२) हासिब हा तरुणांना काश्मीरात पाठवून मास्टर फिदा हुसेन याच्या मदतीने दहशतवाद्यांना सुपुर्द करण्याचे काम करत असल्याचेही दिसून आले आहे.

जळगाव येथील अक्सा मशीदीचे विश्‍वस्त

१) जळगाव येथील अक्सा मशिदीच्या विश्‍वस्तांनी प्रत्येक रविवारी होणार्‍या मगरिबच्या नमाजनंतर तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी सिमी संघटनेला परवानगी दिली. यात मुस्लिमांवरील कथित अत्याचारांच्या अतिरंजित कहाण्या सांगून तरुणांना चिथावणी देत काश्मीरातील कथित मुक्तियुद्धासह मुस्लीम समुदायाच्या हितासाठी जिहाद करण्यास प्रेरित केले जात असे.

२) भविष्यात अशा प्रकारे मशिदीचा उपयोग होऊ नये म्हणून विश्‍वस्तांनी तातडीने बैठक घेतल्याची माहिती समोर आली असली, तरी याबाबत कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत.

पालकांची भूमिका

१) प्राप्त माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या युवकांच्या पालकांना त्यांना काश्मीरात अटक केल्यानंतरच या प्रकरणाची माहिती मिळाली. तथापि, हे तरुण सिमीच्या संपर्कात असल्याचे आणि त्यांच्या हालचालींची माहिती असल्याची बाबही त्यांना बर्‍यापैकी ज्ञात होती. एवढेच नव्हे, तर हे तरुण काश्मीरातून परत आल्यानंतरही त्यांच्या पालकांनी याची माहिती दुसर्‍या कुणालाही कळू दिली नाही. अगदी त्यांनी पोलिसांनाही याबाबत माहिती न देता ते फक्त सिमीच्या पदाधिकार्‍यांना भेटले. याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना सिमीतर्फे गप्प राहण्यासाठी धमकावण्यात आले होते.

 

साभार : ‘सिमी’ : दी फर्स्ट कनव्हिक्शन इन इंडिया, या पुस्तकातून

लेखक : विजय वाघमारे, मो. ९२८४०५८६८३

आम्हाला फॉलो करा

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!