भाजपाला जास्त जागा पण शिवसेनेशिवाय पर्याय नाही – खा. राऊत

sanjay raut

मुंबई, वृत्तसंस्था | राज्यात भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नसून, शिवसेनेशिवाय ते राज्य करु शकत नाहीत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या निकालात १०० चा आकडा पार करेल, असा आत्मविश्वासही व्यक्त केला. तसेच महायुती २०० चा आकडा पार करेल, असा दावाही त्यांनी केला. महायुती २०० च्या वर जाणार हे सांगायला कोणत्याही एक्झीट पोल किंवा ज्योतिषाची गरज नाही, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

 

१२४ जागा जेव्हा आम्ही लढत असून प्रत्येक जागा ही जिंकण्यासाठीच असते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “२०१४ मध्ये कोणतीही युती नसताना आम्ही निवडणूक लढली. ‘तुझं माझं जमेना तुझ्याविना करमेना’ही म्हण राजकारणात योग्य ठरते. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाला एकमेकांशिवाय पर्याय नाही. शिवसेनेशिवाय भाजपा राज्य करु शकत नाही. भाजपाला जास्त जागा मिळतील, हे मान्य करायला काही हरकत नाही. पण जागा जास्त मिळाल्या तरी तरी महाराष्ट्रात शिवसेनेचे महत्त्व कमी होणार नाही, असेही खा. राऊत यांनी सांगितले.

“एक्झिट पोल आपापल्या पद्धतीने काम करत असतात. पोल घेण्याची आम्हाला काही गरज वाटत नाही. शिवसेना-भाजपा युतीच्या बाजूने निकाल लागणार हे स्पष्टच होते. फक्त विऱोधी पक्ष म्हणून कोण पुढे राहील ? असा प्रश्न होता,”असे राऊत यांनी सांगितले आहे. उद्या निकाल लागणारच आहेत, मग अंदाज कशाला लावत बसायचा असं सांगतानाच राजकारण्यांना एखाद्या आकड्यावर टिकून राहणे शोभत नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

“मी गुळगुळीत बोलत नाही. मी अनेक वर्ष शिवसेनेत आहे. शिवसेनेचं काम करत आहे. बाळासाहेबांनी जे शिकवलं आहे, त्यापलीकडे माझं पाऊल पडणार नाही. शिवसेना पुढील सत्तेतही राहील. कोणी कितीही प्रयत्न केला तरी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणं शक्य नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बहुमत हे पाण्यासाऱखे असते, कोणाच्या हातात जास्त काळ राहत नाही, असेही ते यावेळी म्हणाले. सत्तेत समान वाटा मिळेल का असं विचारलं असता, “अमित शाह यांच्यासमोर गोष्टी ठरल्या आहेत. शपथा आणि शब्द पाळणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे,” असे सूचक उत्तर त्यांनी यावेळी दिले.

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार का ? असं विचारला असता त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार हा उद्धव ठाकरेंचा शब्द आहे. शिवसेनेचे सर्व नेते यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील राहतील. शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा, अशी आमचीही इच्छा आहे.”महाराष्ट्रात कमी मतदान होणे चिंतेचे आहे. जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावायला हवा होता. लोक कमी मतदान का करत आहेत ? याबद्दल चिंतन होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Protected Content