संजय राठोड यांना घेरण्यासाठी ठाकरेंची रणनिती

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना घेरण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी रणनिती आखली असून बंजारा समाजातील मान्यवर व्यक्तीमत्वाला त्यांच्या समोर निवडणुकीत उतारण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या प्रत्येक आमदाराच्या विरोधात मातोश्रीवरून रणनिती सुरू झाली आहे. यात प्रामुख्याने मंत्र्यांना टार्गेट करण्यासाठी त्यांच्या विरोधात मातब्बर उमेदवारांना आतापासूनच पाठबळ देण्यास प्रारंभ झाला आहे. या अनुषंगाने बंजारा समाजातील नेते मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सक्षम उमेदवार शोधण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांच्या विरोधात बंजारा समाजातील पोहरादेवीच्या महंतांना शिवसेनेकडून निवडणुकीसाठी तिकीट देण्याची शक्यता आहे. लवकरच पोहरादेवी मंदिराचे महंत शिवबंधन बांधणार असल्याचीदेखील चर्चा सुरू आहे.

संजय राठोड यांनी शिंदे गटाची साथ दिल्याने त्यांच्यावर समाजातून मोठ्या प्रमाणात टिकेची झोड उठली आहे. आता मंत्री बनले तरी त्यांचे पाहिजे त्या प्रमाणात स्वागत न झाल्याने समाजातील नाराजी लक्षणीय पध्दतीतून दिसून आली आहे. यातच बंजारा समाजात पोहरादेवी हे मोठं दैवत असल्यामुळे तेथील मंदिरांच्या महंतांना शिवसेनेत घेण्याचा उद्धव ठाकरे यांचा विचार असल्याची चर्चा सुरू आहे. लवकरच महंत शिवबंधन बांधणार असून विधासभेसाठी महंतांना तिकीट देणार असल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे.

Protected Content