यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिनिमित्त रंगले ऑनलाइन कविसंमेलन

जळगाव प्रतिनिधी । यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने जळगाव केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन कविसंमेलनात एकापेक्षा एक सरस कवितांचे सादरीकरण करण्यात आले.

भारताचे माजी उपपंतप्रधान कै. यशवंतराव चव्हाण यांचा बुधवारी स्मृतीदिन आहे. या निमित्त सोमवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या जळगाव विभागीय केंद्रातर्फे ऑनलाइन कविसंमेलन घेण्यात आले. केंद्राचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील हे कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर उपस्थित कवींनी वेगवेगळ्या विषयांवर प्रत्येकी तीन कविता सादर करून कविसंमेलनात रंगत आणली.

याप्रसंगी कवी अशोक सोनवणे यांनी आपल्या कवितेतून शेतकर्‍याची व्यथा मांडली. अशोक जोशी यांनी मैत्रीत होणारा विश्‍वासघात मांडला. माया धुप्पड यांनी पसायदान मागितले. तर प्रा. योगिता पाटील यांनी गझल सादर केली.

प्रा. दीपक पवार यांनी कविसंमेलनात निवेदकाची भूमिका पार पाडली. तर केंद्राचे सचिव डॉ. सुनील पाटील यांनी आभार मानले. कवी अशोक सोनवणे, अशोक जोशी, माया धुप्पड, प्रा. योगिता पाटील, प्रा. दीपक पवार हे निमंत्रित कवी होते.

Protected Content