महत्वाची बातमी : जिल्हा दुध संघासाठी मतदानास प्रारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड गाजत असलेल्या जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी मतदानास सकाळपासून प्रारंभ झाला आहे.

जिल्हा दुध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली आहे. यात एकूण २० संचालकांची निवड करण्यात येणार असून यात पाचोरा तालुक्यातून माजी आमदार दिलीप वाघ हे आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत. यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आणि महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत आहे. यातील सहकार पॅनलची धुरा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे तर शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. यात शेतकरी पॅनलमध्ये दोन्ही मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांचा समावेश आहे. सहकार पॅनलमध्येही मावळत्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांच्यासह मातब्बर नेत्यांचा समावेश आहे.

यात  अमळनेर व चोपडाच्या ७८ मतदारांसाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मतदान केंद्र आहे. भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगरच्या ४४ मतदारांसाठी म्युन्सिपल हायस्कूल, जामनेर रोड भुसावळ हे मतदान केंद्र आहे. चाळीसगावच्या ५९ मतदारांसाठी हिरुभाई हिमाभाई पटेल प्रथमिक विद्यालय चाळीसगाव हे मतदान केंद्र आहे. एरंडोल, धरणगाव व पारोळाच्या ६७ मतदारांसाठी एरंडोल येथील सूर्योदय जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था, दत्त कॉलनी हे आहे. रावेर यावलच्या ६० जागांसाठी म्युन्सिपल हायस्कूल अँँड ज्युनिअर कॉलेज फैजपूर येथे मतदान होणार आहे.   जळगाव व जामनेरच्या ५७ मतदारांसाठी मतदान केंद्र जळगाव येथील रिंग रोडवरील श्री सत्यवल्लभ हॉल हे असणार आहे. तर पाचोरा, भडगावच्या ७६ मतदारांसाठी श्री गो. से. हायस्कूल पाचोरा येथे मतदान केंद्र असणार आहे.

या निवडणुकीसाठी एकूण ४४१ मतदार असून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर आज सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीत मतदान होणार आहे. या अनुषंगाने आज सकाळी आठ वाजेपासून मतदान सुरू झाले असून याची मतमोजणी उद्या होणार आहे. यात कोण बाजी मारणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content