महापालिकेच्या वाढीव मागणीला कात्री

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी आता ४२ कोटीऐवजी ३८ कोटी रूपयांचा निधी मिळणार असून नगरविकास खात्याने वाढीव मागणीला कात्री लावल्याचे यातून दिसून आले आहे.

नगरविकास मंत्र्यांनी स्थगिती उठवल्याने शहरातील रस्त्यांसाठी निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. तथापि, यासाठी मनपाने सादर केलेल्या प्रस्तावातील आकस्मिक खर्च व भाववाढ नाकारत ३८ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून कामांच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत ४१ कोटी ९५ लाख रुपयांच्या मर्यादेत तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावातील आकस्मिक खर्चाची १ कोटी ६६ लाख ७६ हजार रुपये व भाववाढीचे २ कोटी ४९ हजार रुपये हे घटक महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत प्रकल्पांसाठी अनुज्ञेय नसल्याने ते वगळून उर्वरित ३८ कोटी २८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे रस्त्यांसाठी ४२ नव्हे तर ३८ कोटी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, शासनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने पत्र पाठवून मक्तेदाराकडून तातडीने रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी केली आहे.

Protected Content