विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; काम बंद आंदोलनामुळे निर्णय

जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचार्‍यांच्या आंदोलनामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या आपत्तीमुळे महाविद्यालयातील अंतिम वर्षाला असणार्‍या विद्यार्थ्यांच्या परिक्षांवरून मोठे राजकारण रंगले होते. अखेर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १ ते ३१ ऑक्टोबरच्या दरम्यान परीक्षा घेण्यात येतील असा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. यानुसार सर्व विद्यापीठांनी परिक्षांची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, परीक्षा सुरू होण्याआधीच २४ सप्टेंबर पासून विद्यापीठीय तसेच महाविद्यालयीन कर्मचार्‍यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अन्य मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. १ ऑक्टोबर पासून हे आंदोलन अजून तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा कृती समितीने दिला आहे. या पार्श्‍वभूमिवर आज राज्यातील काही विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्राच्या अंतीम वर्षाच्या परिक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील यांनी याबाबतचे पत्र विद्यापीठाच्या अंतर्गत येणार्‍या सर्व महाविद्यालयांना पाठविले आहे. परिक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच पाठविण्यात येणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

Protected Content