फुले विकास महामंडळाच्या योजनेत अपहार; दोन अधिकारी अटकेत

जळगाव प्रतिनिधी । शासनाच्या महात्मा फुले विकास महामंडळातून ७०२ लाभार्थींचे बनावट कागदपत्र सादर करून साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने एसबीआयच्या दोन अधिकार्‍यांना अटक केली आहे.

शासनाच्या महात्मा फुले विकास महामंडळातून ७०२ लाभार्थींचे बनावट कागदपत्र सादर करून बीज भांडवल योजना व सबसिडीपोटी साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. सन २०१६ ते २०१८ दरम्यान घडलेल्या या प्रकरणात २ ऑगस्ट २०१९ रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात खंडू विठोबा लोहकरे (वय ४६, रा. शिवाजीनगर, नाशिकरोड), सागर वसंत अडकमोल (वय ३९, रा. महाबळ परिसर, रविराज कॉलनी, जळगाव), मुकेश देवराव बारमासे (वय ५०, रा. बुद्धनगर, नागपूर), जयेश रघुनाथ सोनार (वय २८, रा. गायत्रीनगर, जळगाव), सुनंदा बाबूराव तायडे (वय ५९, रा. वानखेडे हौसिंग सोसायटी, जळगाव), प्रकाश लक्ष्मीकांत कुळकर्णी (वय ३८, रा. राधाकृष्णनगर, जळगाव) या सर्वांनी मिळून हा अपहार केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, जयेश सोनार व सुनंदा तायडे हे बँकेतील अधिकारी आहेत. सोनार हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जळगाव मुख्य शाखेत सहायक म्हणून नोकरीस होता. त्याने स्वत:चा यूजर आयडी वापरून गुन्ह्यातील चेक क्लिअरिंग करून त्याची रक्कम ज्या व्यक्तींच्या नावे चेक नव्हते त्यांच्या वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात वर्ग केली.

सुनंदा तायडे या बँकेच्या शिवाजीनगर शाखेत सहायक प्रबंधक म्हणून नोकरीस आहेत. त्यांनी कंत्राटी कामगार प्रकाश कुलकर्णी यांनी आणलेले चेक टेबल काउंटर करून क्लिअरिंग केले. तसेच स्वत:च्या चालू खात्यात वर्ग केले. त्यांनी कुलकर्णी याने आणलेल्या ३२ लाख ४० हजार रुपयांचे ३६ चेकचे डीडी तयार करून बँकेच्या नियमांचे उल्लंघन केले. जयेश सोनार व सुनंदा तायडे या दोघांना बुधवारी अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर केले असता ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Protected Content