भरधाव ट्रकची कारला धडक : दोन ठार; तीन जखमी

जळगाव प्रतिनिधी । उमाळा घाटात कारला समोरून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत वृत्त असे की, अर्चना रामेश्‍वर चौधरी (रा. वाकोद, ता. जामनेर) यांच्या माहेरकडील नातेवाइक जळगावातील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना पाहण्यासाठी रामेश्‍वर चौधरी हे शनिवारी दुपारी कुटुंबियांसह चारचाकीने (एम.एच. १९, बीयु ३९१८) जळगावात आले होते. यावेळी त्यांच्या सोबत गावात राहणारे मित्र डिगंबर भोसले देखील जळगावात आले होते. रूग्णाची भेट घेतल्यानंतर सर्वजण परत जात असताना उमाळा घाटात त्यांच्या चारचाकीस समोरुन येणार्‍या ट्रकने (एमएच ४१ एयु १८०७) जोरदार धडक दिली.

या धडकेत नमु रामेश्‍वर चौधरी (वय ८) व डिगंबर रामराव भोसले (वय ४०, दोघे रा. वाकोद, ता. जामनेर) हे दोन्ही जागीच ठार झाले आहेत. तर रामेश्‍वर रामदास चौधरी (वय ३५), आई अर्चना (वय ३२) व लहान भाऊ साई (वय ६) हे तिघे जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी जखमींना शासकीय वैद्यकी रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content