प्रांताधिकार्‍यांच्या वाहनाला डंपरने धडक देणारा वाळू माफिया अटकेत

यावल प्रतिनिधी । प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या शासकीय वाहनाला डंपरने धडक देऊन ज्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या ज्ञानेश्‍वर नामदेव कोळी (रा. कोळन्हावी, ता. यावल) या वाळू तस्कराला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.

फैजपूर विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी कैलास कडलग व त्यांचे वाहन चालक उमेश चिंधू तळेकर हे २४ रोजी कोळन्हावी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. या वेळी एमएच १९ झेड ४७४९ क्रमांकाच्या डंपरमधून वाळुचोरी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कडलग यांनी डंपरचा पाठलाग केला. डंपरचालक महेंद्र धनराज तायडे हा डंपर न्हावी गावातील एका रुग्णालयाच्या कोपर्‍यात घेऊन गेला. कडलग तेथे वाहनासह पोहचले असता चालक तायडे याने डंपर रिव्हर्समध्ये घेऊन कडलग यांच्या वाहनास धडक दिली. या घटनेनंतर प्रांताधिकारी कडलग यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल होताच क्षणी सर्व वाळुमाफीया फरार झाले होते. पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, प्रकाश वानखेडे, नरेंद्र वारुळे, गोकुळ तायडे, किरण चाटे, विलास सोनवणे यांच्या पथकाने ज्ञानेश्‍वर कोळी याला शनिवारी अटक केली. या प्रकरणात या डंपरमध्ये असणारे अर्जुन बाविस्कर व चंद्रकांत सोळंके हे दोन आरोपी मात्र अद्यापही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Protected Content