आव्हाणे येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

 

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे  येथील विवाहितेने राहत्या घरातील वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी ११ वाजता उघडकीला आली. अकस्मात पत्नीने आत्महत्या केल्याचे पाहून पतीने जिल्हा रूग्णालयात आक्रोश केला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आव्हाणे येथील नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य इमाम युनूस पिंजारी हे आपल्या पत्नी शबनमबी इमाम पिंजारी (वय 25) , भाऊ, आईवडील यांच्यासह एकत्र राहतात. त्यांचे घर दुमजली आहे. इमाम पिंजारी हे बांधकाम ठेकेदारीचे काम करतात. दरम्यान, आज सकाळी इमाम पिंजारी आणि त्यांचे भाऊ कामाला निघून गेले. त्यावेळी शबनमबी पिंजारी आणि जेठणी घरी एकट्याच होत्या. जेठाणी ह्या खालच्या घरात काम करत असतांना शबनमबी यांनी वरच्या घरात जावून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी ११ वाजता उघडकीला आला. शेजारच्यांनी आणि नातेवाईकांनी त्वरीत त्यांना खाली उतरवून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात नेण्यात आले. वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. 

दरम्यान, मयत शबनमबी पिंजारी यांच्या घराच्या शेजारी तीन महिन्यांपूर्वी एका महिलेने अशाच पध्दतीने गळफास घेवून आत्महत्या केली होती. त्याच विचारात त्या काही दिवस होत्या. यामुळे सासरचे मंडळी शबनमबी यांना एकटे राहू देत नव्हते. त्यात त्यांची तब्बेत व्यवस्थित राहत नसल्यामुळे विवाहिता काही दिवस नशिराबाद येथील माहेरी आईवडीलांकडे राहत होते. आव्हाणे ग्रामपंचायत निवडणूकीत पती इमाम पिंजारी ग्रामपंचाय निवडणूकीतून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहे. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद येथील सासर माहेरची मंडळी यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली असून प्रचंड आक्रोश केला. तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. निवडणूकीसाठी पुन्हा त्या सासरी आल्या होत्या. त्यानंतर ही घटना घडली. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, आई-वडील असा परीवार आहे.  

Protected Content