भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिव कॉलनीजवळच्या रेल्वे उड्डाण पुलावर भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एका महापालिका कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण मांगो हटकर (वय-५८) रा. नंदनवन कॉलनी हे महानगरपालिकेत पुरवठा विभागात कामाला आहे. ते शहरात पाणी सोडण्याचे काम करतात. आज सकाळी १० वाजता ते कामावर हजर झाले. दुपारी त्यांनी कोल्हे नगर परिसरात पाणीपुरवठ्याचे काम आटोपल्यानंतर दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीई ३१०८) ने जेवणासाठी नंदनवन कॉलनी येथे जेवणासाठी घरी जात असतांना शिवकॉलनी उड्डाणपुलाजवळ मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यात ते गाडीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला.

मयत नारायण हटकर यांचा मुलगा पवन हटकर हा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आहे. नंदनवन कॉलनीकडून गावात पवन आपल्या बहिणीसोबत कामानिमित्त गावात जात असतांना शिवकॉलनीजवळ नारायण हटकर दुचाकीवरून जात असल्याचे दिसले व वडील हे जेवण्यासाठी जात असल्याचे मुलाच्या लक्षात आले. पण काही अंतर कापल्यावर मुलगा पवन याला वडीलांचा अपघात झाल्याचा फोन आला. पवनने तातडीने रिक्षा वळविली व अपघात स्थळी धाव घेतली. वडील जखमी पडल्याचे दिसताच मुलगी आशा आणि मुलगा पवन यांनी त्वरील जखमी अवस्थेत नारायण हटकर यांना रिक्षात टाकून खासगी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्यांचा वाटेतच प्राणज्योती मालविली होती. जिल्हा शासकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधीत ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content