जळगाव प्रतिनिधी । क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांच्या सोबत झालेल्या बैठकीत क्रीडा संकुलाचे शुल्क कमी करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती क्रीडा शिक्षक महासंघाचे राजेश जाधव यांनी दिली आहे.
खेळाडूंच्या असुविधा व क्रीडा संकुलातील अवाजवी शुल्काबाबत शारीरीक शिक्षण महामंडळ व राज्य क्रीडा शिक्षक महासंघाच्या पदाधिकार्यांची महाराष्ट्र युवक सेवा संचालनालयाचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत क्रीडा संकुलातील अवाजवी शुल्कासह विविध विषयांवर चर्चा होऊन क्रीडा संकुलातील अवाजवी शुल्काला लगाम बसणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये खेळ भावना विकसित व्हावी, खेळाच्या सरावातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्यासाठी तालुका ते विभागीय क्रीडा संकुले उभारण्यात आली. ही क्रीडांगणे विविध खेळ संघटना व क्रीडा मंडळांना सशुल्क शासन निर्णयाधीन राहून वापरास दिली; मात्र अनेक क्रीडा संकुलात खेळाडू हितापेक्षा व्यावसायिकतेला महत्त्व दिले जात असल्याने खेळाडूंची कुचंबणा होत असल्याचे क्रीडा आयुक्त बकोरीया यांना या बैठकीतून लक्षात आणून दिल्याने त्यांनी सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी व उपसंचालकांना शुल्क निर्धारणाबाबत आदेश दिल्याची माहिती क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव यांनी दिली.