एस. टी. कर्मचार्‍यांची अडवणूक; आगार प्रमुखांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । जनता कर्फ्यूच्या दरम्यान एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांची अडवणूक होत असून याच्या विरोधात आज आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले.

जळगाव आगारातील भोंगळ कारभार थांबवण्यासाठी संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी आगार व्यवस्थापक निलेश पाटील यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांना निवेदन देऊन एसटी कर्मचार्‍यांच्या समस्या अवगत करण्यात आल्या. एसटी पर्यवेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी जमा केली जात असल्यामुळे जळगाव येथील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने तसेच एसटी महामंडळाच्या परिपत्रकाचा देखील भंग होत असल्यामुळे संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी अधिकार्‍यांना आंदोलनाचा इशारा दिला.

१) रजेचे अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात येते.

२) एसटी कर्मचार्‍यांना मास्क व सॅनिटायझर चा पुरवठा होत नाही.

३) महिला वाहक कर्मचार्‍यांना रात्री बारा वाजेनंतर संपणारी ड्युटी लावण्यात येते.

४) काही सुपरवायझर कडून सूडबुद्धीने त्रास दिला जातो तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

५) आवश्यकता नसताना देखील किंबहुना बससेवा आंशिक प्रमाणात सुरू असतांना देखील प्रशासकीय परिपत्रकाचा भंग करून कर्मचार्‍यांची गर्दी जमा केली जाते व सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवण्यात येतो.

६) ड्युटी न मिळालेल्या कर्मचार्‍यांना स्पेअर भरून देण्याबाबत संबंधित रजिस्टर उपलब्ध होत नाही.

७) प्रशासकीय अनास्थेमुळे आत्महत्यासारखा प्रकार घडला तर त्यास प्रशासन जबाबदार राहू शकते.

या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली त्या अनुषंगाने आगार व्यवस्थापक निलेश पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ सूचना देऊन खालील प्रमाणे तोडगा काढला.

१) एसटी कर्मचार्‍यांनी केलेले रजेसह कोणतेही अर्ज नाकारले जाणार नाहीत वस्तुस्थिती पाहून अर्जांवर सकारात्मक कारवाई केली जाईल.

२) मास्क व सॅनिटायझर चा पुरवठा नियमितपणे सुरू राहील.

३) महिला वाहकांना रात्रीचे कर्तव्य लावण्यात येणार नाही.

४) उर्मट वर्तणुकीची संदर्भात तक्रार आल्यास चौकशी केली जाईल.

५) रोटेशन प्रमाणे कर्तव्य लावण्यात येईल. कर्तव्य न मिळालेल्या कर्मचार्‍यांना स्पेअर(हजेरी) भरून देण्यात येईल.

६) स्पेअर रजिस्टर हे चालक वाहकांसाठी स्वतंत्र करून वाहन परीक्षक कार्यालय व कॅश/इशू सेक्शनला ठेवण्यात येईल.

७) कर्मचार्‍यांच्या या समस्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील.

या बैठकीला सकारात्मक प्रतिसाद देऊन आगार व्यवस्थापक निलेश पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार केला याप्रसंगी संयुक्त कृती समितीचे आर. के. पाटील, गोपाळ पाटील, विनोद पाटील, मनोज सोनवणे, आर. आर. शिंदे, शैलेश ननवरे, प्रताप सोनवणे, गणेश पाटील, ललित गायकवाड, भालचंद्र हटकर यांच्यासह कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.

Protected Content