जळगाव प्रतिनिधी । शहरातील मोहाडी रोडवर असणार्या दौलत नगरात बुरखाधार्यांच्या एका टोळक्याने व्यावसायिकाच्या घरात जबरीने प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत २३ लाख रूपयांचा ऐवज घेऊन पलायन केल्याची घटना आज पहाटे घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, दौलत नगर परिसरात पिंटू बंडू इटकरे (वय ३५) हे लोखंडी सामानाचे व्यापारी पत्नी आणि मुलीसह राहतात. त्यांच्या तळमजल्यावर पार्कींग असून वर दोन मजले आहेत. आज सकाळी सव्वातीन वाजेच्या सुमारास हे तिन्ही जण गाढ झोपेत असतांना सहा जणांनी घरात प्रवेश केला. त्यांनी इटकरेंची पत्नी सौ. मनिषा यांना तोंड दाबून उठविले. तर पिंटू इटकरे यांना चाकू लाऊन घरात काय जे असेल ते काढून देण्यासाठी धमकावले. घाबरलेल्या इटकरे यांनी घरातील तीन लाख रोकड आणि २० लाखांचे दागिने घेतल्यानंतर धमकावत हे सहाही जण निघून गेले.
या सहा दरोडेखोरांपैकी पाच जणांनी संपूर्ण चेहरा झाकला जाईल असा मास्क घातला होता. तर सहाव्याने तोंडावर विदूषकाचा मास्क लावला होता. सव्वा तीन ते चार वाजेपर्यंत ते इटकरे यांच्या घरात होते. येथून पलायन करतांना त्यांनी तळमजल्यावर लावलेल्या सीसीटिव्हीचा डीव्हाआर काढून घेतला. तर इटकरे पती-पत्नी या दोघांचा मोबाईल घेऊन तो खाली फेकून दिला.
भेदरलेल्या इटकरे दाम्पत्याने उजडल्यानंतर रामानंद नगर पोलीस स्थानकात धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर रामानंद नगर पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. शेवटचे वृत्त आले तेव्हा या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.