सौर ऊर्जा प्रकल्पाची एसआयटीमार्फत चौकशी करा; अन्यथा आंदोलन

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सौर उर्जा प्रकल्पाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करावी अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी बचाव कृती समितीने निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील बोढरे, शिवापूर शिवारातील सौर उर्जा प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी बचाव कृती समितीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. यात म्हटले आहे की, तालुक्यातील बोढरे, शिवापूर येथील जवळपास १२०० एकर नवीन अधिभाज्य शर्तीच्या शेतजमिनी बेकायदेशीर मार्गाने कवडीमोल भावात बळकावून त्यावर सोलर प्रकल्प थाटण्यात आला आहे. या प्रकरणी तत्कालीन महसूल राज्य मंत्री व विद्यमान वनमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली सलग तीन वेळा मंत्रालयात बैठका होऊन चौकशीअंती प्रकल्पाचा बेकायदेशीर कारभार ऊजेडात आला होता. तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांच्या आदेशावरून चाळीसगावचे प्रांत यांनी चौकशी करून जळगावचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास चौकशी अहवाल ही सादर केला होता. मात्र, राजकीय दबावापोटी या प्रकल्पांवर कुठलीच कारवाई झालेली नाही.

या संदर्भात, माजी आमदार अनिल गोटे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी ही एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश दिल्याचे अनिल गोटेंनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर ही केले होते. परंतू अद्याप चौकशीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आगामी १५ दिवसाच्या आत या संदर्भात एसआयटीमार्फत चौकशी सुरू न झाल्यास शेतकरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून पीडित शेतकरी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषणास बसतील, असा इशारा शेतकरी बचाव कृती समितीने दिला आहे.

या निवेदनावर शेतकरी बचाव कृती समितीचे सचिव भीमराव जाधव यांची स्वाक्षरी असून हे निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री, महसूलमंत्री व वनमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.

Protected Content