केशव स्मृती प्रतिष्ठानला ‘पुरूषोत्तम पुरस्कार’ जाहीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | समाजसेवेचा मापदंड प्रस्थापित करणार्‍या केशव स्मृती प्रतिष्ठानला प्रतिष्ठेचा ‘पुरूषोत्तम पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

शहादा येथील स्व. पी. के. अण्णा फाऊंडेशनमार्फत देण्यात येणार्‍या पुरूषोत्तम पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात यंदाचा पुरूषोत्तम पुरस्कार हा पुणे येथील जादूगार रघुवीर तर संस्थात्मक पातळीवरचा पुरस्कार जळगाव येथील केशव स्मृती प्रतिष्ठानला जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रूपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी या पुरस्काराची घोषणा केली असून याचे वितरण पी. के. अण्णा यांच्या जयंती दिनी म्हणजेच ९ ऑक्टोबरला केले जाणार आहे.

जळगाव येथील केशव स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपसंस्थांच्या माध्यमातून जनहिताचे विविध उपक्रम राबविले जातात. यात माधवराव गोळवलकर रक्तपेढी, मातोश्री वृध्दाश्रम, क्षुधाशांती झुणका-भाकर केंद्र आदींसह विविध प्रकल्पांचा समावेश आहे. समाजसेवेचे मापदंड प्रस्थापित करणारी संस्था म्हणून केशवस्मृती प्रतिष्ठानने लौकीक मिळविला आहे. पुरूषोत्तम पुरस्काराच्या माध्यमातून संस्थेच्या कामाला कौतुकाची थाप मिळाली असून यामुळे समाजाच्या विविध स्तरांमधून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: