भूमिअभिलेख कर्मचार्‍यांचा भोंगळ कारभार : आ. भोळे यांची तक्रार

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त झाले असून या प्रकरणी आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्ह्याधिकार्‍यांकडे तक्रार करत यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी कामात टाळाटाळ करीत असून, नागरिकांची फिरवाफिरव करीत असल्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. याची दखल घेत, आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे.

भूमिअभिलेख कार्यालयात मोजमाप, मिळकत दाखला व इतर शासकीय कामांबाबत नागरिकांची फिरवाफिरव करण्यात येत आहे. कर्मचार्‍यांकडून विनाकारण त्रास देण्यात येत आहे. या कार्यालयातील कर्मचारी हे वारंवार गैरहजर राहतात. नागरिकांच्या कामासाठी व दाखले देण्यासाठी टाळाटाळ करतात. बाहेरगावावरून येणार्‍या नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने त्यांना सतत ये-जा करावी लागते. किरकोळ कामासाठी खोळंबून ठेवतात, या आशयाच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने दोन वेळेस या कार्यालयाला भेट देऊन संबंधित अधिकार्‍यांना याबाबत सूचनाही स्वत: दिल्या होत्या; परंतु या कार्यालयात नागरिकांची फिरवाफिरव सुरूच आहे. नागरिकांची कामे करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आमदार भोळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले. यात संबंधीतांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Protected Content