जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यात शनिवारी झालेल्या वादळीवाऱ्यासह अवकाळी गारांच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची आमदार राजूमामा भोळे Rajumama Bhole यांनी आज २१ मार्च रोजी दुपारी २ वाजता पाहणी केली. तालुक्यातील उमाळे, देव्हारी, धानवड व चिंचोली शिवारात नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिलेत.
तालुक्यातील शिवारातील अवकाळी पावसामुळे पिके जमीनदोस्त झाली आहे. तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. यात शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या नुकसानीची आमदार राजूमामा भोळे Rajumama Bhole यांनी पाहणी केली.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधुन तालुक्यातील उमाळे, देव्हारी ,धानवड व चिंचोली शिवारात पाहणी केली. यावेळी तहसिलदार व प्रांत यांच्यासोबत सुध्दा आमदार फोनवर चर्चा करुन नुकसानीची माहिती देऊत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसान पाहुन आमदार राजुमामा यांनाही गहिवरून आले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली.
भारतीय जनता पार्टी तुमच्या सोबत असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना दिला. यावेळी भाजपा नेते चंद्रशेखर अत्तरदे, भाजपा तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, जळगाव बाजार समितीचे माजी उपसभापती मनोहर पाटील, तालुका सरचिटणीस संदिप पाटील, अरूण सपकाळे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस भाऊसाहेब पाटील, तालुका उपाध्यक्ष रघुनाथ चव्हाण, मिलिंद भाऊ लाड, नंदलाल पाटील, गिरीश वराडे आधार पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.