मुंबई प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातर्फे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १० प्रवक्त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याच्या सोबत खासदार अरविंद सावंत, खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार डॉ. नीलम गोर्हे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, महापौर किशोरी पेडणेकर यांची पक्ष प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती शिवसेना कार्यालयातून देण्यात आली.
शिवसेनेच्या प्रवक्त्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातून एकमेव ना. गुलाबराव पाटील यांची प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे. मुलूखमैदान तोफ म्हणून ओळखल्या जाणार्या ना. पाटील यांचे या माध्यमातून पक्षात वजन वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.