पर्यावरण पूरक गॅस दाहिनीला प्रतिसाद

जळगाव प्रतिनिधी । केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे शहरातील वैकुंठधामात गॅसवर चालणार्‍या शव दाहिनीला कार्यान्वित करण्यात आले असून याला समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या संदर्भात मल्टीमीडिया फिचर्सचे सीईओ सुशील नवाल यांनी व्यक्त केलेली भावना !

केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे शहरातील वैकुंठधामात गॅसवर चालणार्‍या शव दाहिनीला कार्यान्वित करण्यात आले आहे. याबाबत मल्टीमीडिया फिचर्सचे सीईओ सुशील शामसुंदर नवाल यांनी एका पोस्टच्या माध्यमातून या पर्यावरण पूरक उपक्रमाची वाखाणणी केली आहे. आपल्यासाठी ही पोस्ट जशीच्या तशी सादर करत आहोत.

गॅस दाहिनीला समाजाकडून उत्तम प्रतिसाद

केशवस्मृति प्रतिष्ठानद्वारे जळगाव शहरातील वैकुंठधाम येथे गॅसवर चलीत शवदाहिनी ही ३१ जानेवारी २०२१ पासून कार्यान्वित झाली. १ फेब्रुवारीला तिचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. लॉकडाऊन दरम्यान विधायक आणि सकारात्मक कार्याला सलाम देणारी मोठी उपस्थिती या सोहळ्याला होती. आज जवळपास दोन महिने पूर्ण होत आले. नेमका या गॅसदाहिनीचा उपयोग कोण करतो आहे? कशी चाललेली आहे? पूर्ण काळ तिची उपयुक्तता किती महत्त्वाची आहे? या प्रश्‍नाची माहिती घेण्यासाठी संस्थेचे सागर येवले यांच्याशी संवाद साधला. कालपर्यंत या शवदाहिनीमध्ये १०६ शवांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक जाती-पंथ-धर्म यांनी शास्त्रोक्त पद्धतीने या शवदाहिनीचा उपयोग केला. विशेषत: मध्यमवर्गीयांनी त्याचा जास्त उपयोग केला. बोटावर मोजण्याइतकेच उच्चवर्गीयांनी याचा उपयोग केला जो वाढणे गरजेचे आहे.

श्री. येवले यांनी सांगितले की, सर्वसाधारण एका विधीसाठी एक तास दहा मिनिटे लागतात. तदनंतर स्वच्छता आणि शवदाहिनीचे टेंपरेचर मेन्टेन करण्यासाठी वीस मिनिटांचा अवधि द्यावा लागतो. या सर्व कामांसाठी दाहिनीचे ऑपरेटर मयूर सपकाळे व त्यांचे सहकारी ही उत्तम निगा राखीत आहेत. अचानक या कोरोनाकाळात मृत्यू दर वाढल्यामुळे साधारण सकाळी सात ते संध्याकाळी सात ह्या वेळेला पाच किंवा त्याहून अधिक देहांचे अंतिम विधी अनेकदा करण्यात आले आहेत.

या कालावधीत मयूर सपकाळे यांचा अनुभव चांगलाच राहिला. समाजातील अनेक घटकांनी या विधीसाठी स्वतःहून पुढाकार घेतला. इतकेच नव्हे तर विधी झाल्यानंतर चार शब्द कौतुकाचे ही ते बोललेत आणि काही दानशूर व्यक्तींनी देय असलेल्या पंधराशे रुपये नाममात्र शुल्काव्यतिरिक्त गोरगरिबांसाठी उपयुक्त म्हणून अतिरिक्त रक्कमही दिली. (म्हणजेच क्रॉस सब्सिडी म्हणजे ज्यांना अतिरिक्त देणं शक्य आहे त्यांनी दिले व ज्यांना खरंच शक्य नाही त्यांच्यासाठी ते वापरले.) समाजाने या उपक्रमाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. यातून पर्यावरणाची संपत्ती म्हणून जपणूक या अनुषंगाने सामाजिक जागृती ही होत असल्याचे दिसते. अर्थात अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी याचा आवश्यकतेनुसार उपयोग घेतला पाहिजे.

केशवस्मृति प्रतिष्ठानच्या या सकारात्मक स्तुत्य उपक्रमाचे कौतुकच केले पाहिजे आणि अजुन असेच उपक्रम त्यांच्याकडून व्हावे हीच अपेक्षा.

सुशील शामसुंदरजी नवाल

Protected Content