कोरोनाच्या सेकंड म्युटंटसारखी गुन्हेगारीही बदलते आहे — मुख्यमंत्री

 

 नाशिक : वृत्तसंस्था । कोरोना विषाणू रुप बदलतो आहे, त्याचा आता सेकंड म्युटंट आला आहे तसेच काहीसे आता रुप बदलणारी गुन्हेगारी आली आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील उप-निरिक्षकांच्या ११८ व्या सत्राचा दीक्षांत संचलन समारंभ पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे  म्हणाले , “खडतर प्रशिक्षण पूर्ण करताना जल्लोष होणारच. पण बेहोश होऊन चालणार नाही. जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल. त्यासाठी भानावर राहावेच लागेल,”

 

“खडतर प्रशिक्षणानंतर आपण एखादी गोष्ट कमावतो. त्याचा आनंद मोठा असतो. आजचा कार्यक्रम गेल्यावर्षी प्रत्यक्ष अनुभवला आहे. अंगावर रोमांच येतात. भारावून जाणारा समारंभ असतो. शिस्त आणि देखणेपणाचा अनोखा संगम या समारंभात असतो. आज मात्र मास्क घालूनच हा कार्यक्रम करावा लागतो. पोलीस दलाचे हेच महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शिस्त आणि नियमांचे पालन करत आहोत. आजच्या समारंभातून कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी महाराष्ट्राला देत आहोत. आपले शूर जवान टोकाच्या गडचिरोलीत सुद्धा नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करताहेत. त्यांना टिपताहेत. महाराष्ट्राच्या मुळावर उठणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काम करत आहेत,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं.

 

“एका बाजुला नक्षलवादाचा आणि दुसऱ्या बाजुला कोरोनाचा मुकाबला करताहेत. दिसणाऱ्या शत्रुवर तुटून पडता येते. पण शस्त्र कोरोनाविरोधात चालत नाहीत. कारण तो न दिसणाऱा शत्रु आहे. हे आव्हानही पोलीसांनी स्वीकारले आहे. समाजासाठी ते कोरोना काळातही कर्तव्य बजावत आहेत.प्रशिक्षणार्थींनी खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या तेरा महिन्यांच्या प्रशिक्षणातून त्यांनी सद़ृढ शरीर कमावलेच आहे. पण निरोगी आणि निकोप मनही या सेवेसाठी आवश्यक ठरते. कारण सेवा करताना पोलिसांना अनेक भूमिका बजावाव्या लागतात. चित्रपटात दाखवतात आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. प्रत्यक्षात पोलिसांना जमिनीवर राहून काम करावे लागते. त्यासाठी त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाबरोबरच प्रसंगावधान  बाळगावे लागते. कारण पोलिसांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो. केले तर का केले आणि नाही केले, तर का नाही. त्यामुळे खडतर प्रशिक्षणातून मनशक्ती मिळावावी लागते. त्यासाठी इच्छाशक्तीही महत्वाची ठरते,” असं उद्धव ठाकरे  म्हणाले.

 

“प्रशिक्षणार्थींनी स्वतःहून हे आयुष्य निवडलं आहे. ते साधसुधं नाही. यातून त्यांनी त्यांच्याकडे आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे स्वतःहून हे क्षेत्र निवडण्यासाठी आणि कुटुंबापासून दूर राहून खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या प्रशिणार्थींना मानाचा मुजरा करावा लागेल. तुम्ही एक स्वप्न पाहिलं होते. आणि त्या स्वप्नातल्या जगात पहिले पाऊल टाकत आहेत. तेही निधड्या छातीने. गुन्हेगारी क्षेत्राचे आव्हान आता ऑनलाईन आणि त्या स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढू लागले आहे. बँकिंगमधील ऑनलाईन गुन्ह्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. गुन्हे ऑनलाईन असले, तरीही त्या गुन्हेगारापर्यंत पोहचून त्याला प्रत्यक्ष खऱ्या बेड्या घालव्या लागणार आहेत,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

 

प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडत आहात. कुटुंबीय अधीरतेने तुमची वाट पाहत आहेत. आतापर्यंत तुम्ही प्रशिक्षणार्थी तुमच्या कुटुंबियांचे होता. पण आता संपूर्ण महाराष्ट्र हेच तुमचे कुटुंब आहे. या कुटुंबाला आता तुमचा आधार असणार आहे. तुमच्या स्वप्नात आता महाराष्ट्राचे स्वप्न मिसळून पाहावे लागणार आहे.  तुम्हाला रक्षक, भाऊ, पुत्र म्हणून काम करावे लागणार आहे. लोक तुमच्याकडे विश्वासाने येणार आहेत.  जनतेचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवाला असा विश्वासही मला आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कारकिर्द असणारे अधिकारी म्हणून तुम्ही सेवा बजावाल,” अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.

 

११८ व्या सत्रातून ६६८ पोलीस उप निरिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. ज्यामध्ये ४७० पुरूष, १८८ महिला आणि १० गोवा केडरचे प्रशिक्षणार्थी यांचा समावेश आहे. पोलीस उप निरिक्षक शुभांगी शिरगावे यांना सर्वोत्तम प्रशिणार्थींचा सन्मान आणि त्यासाठी रिव्हॉल्व्हर पारितोषिकाच्या त्या मानकरी ठरल्या. याशिवाय सलिम शेख, अविनाश वाघमारे हे उत्कृष्ट प्रशिणार्थी ठरले. दीक्षांत संचलन समारंभात प्रशिणार्थी शुभांगी शिरगावे यांनी परेड कमांडर म्हणून नेतृत्व केले.

Protected Content