माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सोबत माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवानी यांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश हा अनेक अर्थांनी लक्षणीय आहे. विशेष करून वारंवार निष्ठा बदलणार्या बनिया मंडळीची अनेक उदाहरणे समोर असतांना आपल्या नेत्यासोबत कोणताही गाजावाजा न करता पक्षांतर करणारे डॉ. जगवानी हे इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे मानावे लागणार आहेत. याबाबत लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे सल्लागार संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांनी केलेले हे विश्लेषण.
जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा दीर्घ प्रतिक्षित पक्षांतर सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. आता ते राष्ट्रवादी कांग्रेस चे नेते म्हणून ओळखले जातील. परवा पर्यंत ते भाजप चे जेष्ठ नेते, मार्गदर्शक होते, ही ओळख आता भूतकाळात जमा झाली. त्यांच्या सोबत मोजक्याच समर्थकांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश झाला. येत्या काही महिन्यांनी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजप चा त्यागकरून राष्ट्रवादी त प्रवेश करतील, असे सूतोवाच त्यांनीच जाहिरपणे काल केले.येणार्या कालखंडात काय काय होईल, हे समजेलच…
पण मुंबईतील शुक्रवारच्या प्रवेश सोहळ्यात त्यांच्यासह विधान परिषदेचे माजी सदस्य माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवानी यांचाही राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश झाला. खरं तर, जगवानी यांच्या बाबत फारशी चर्चा माध्यमातून अथवा राजकीय पटलावर झाली नाही, या बाबत काहीही कारण असले तरी, त्यांनीच स्वत:हून कोणताही गाजा वाजा किंवा जाहिरतबाजी न करता नाथाभाऊ बद्दल असलेलं स्नेह, आदर आणि विश्वास त्यांच्या विषयी असलेली आपली निष्ठा कृतीतून व्यक्त केली आहे.
वास्तविक पाहता, डॉ. गुरूमुख जगवानी हे काही कसलेले राजकारणी नाहीत. पण एकनाथरावांमुळे त्यांना जी वेळोवेळी संधी मिळाली त्या संधीची परतफेड या माध्यमातून त्यांनी केली असावी. खर तर जगवानी हे अल्प संख्यांक समाजातील असून त्यांना विधान परिषदेची एक नव्हे तर दोन वेळा संधी ही नाथाभाऊंमुळे मिळाली. आमदार म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील सिंधी समाजा साठी जे काम केले ते ऐतिहासिक म्हणता येईल. सिंधी समाजाची मालमत्ता ही ब सत्ताक या प्रकारात गणली जात होती. त्यामुळे ती मालमत्ता खरेदी विक्री करताना अडचणी येत होत्या. ही अडचण त्यांनी शासनाच्या माध्यमातून कायमची मिटवली. आणि हे केवळ आमदार झाल्यामुळे शक्य झाले म्हणून त्यांची पक्ष म्हणून भाजपशी जरी निष्ठा असली तरी ती श्री खडसेंच्या आत्मसन्माना पुढे दुय्यम असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न यातून स्पष्ट होतो.
……निष्ठा ही मानव निर्मित आहे. निष्ठा या मूल्याला सर्वसाधरणपणे उदात्त व श्रेष्ठ असे मानले गेले आहे. सध्या बहुतेक क्षेत्रांत मूल्यांची घसरण होत असताना विशेषतः राजकीय क्षेत्रात तर तिची घसरण पराकोटीची असल्याचे दिसून येते. असे असताना जगवानी यांची ‘गुरुमुखी’ निष्ठा ही नेता निष्ठेचे एक उदाहरण म्हणावे लागेल.
सुरेश उज्जैनवाल
सल्लागार संपादक
लाईव्ह ट्रेंडस न्यूज
संपर्क : ८८८८८८९०१४