शिवनेरी किल्ल्यावर २५ एकरात जैन समूह फुलणार देवराई

जळगाव प्रतिनिधी । छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर जैन उद्योग समूहातर्फे २५ एकरावर देवराई फुलविण्यात येणार आहे.

किल्ले शिवनेरीवर वन विभागातर्फे देवराई साकारण्यात येत आहे. यासाठी जैन उद्योग समूहातर्फे सामाजिक बांधिलकी जपत पहिल्या टप्प्यात सुमारे २१ लाखांची ठिबक सामग्री बसवण्यात येणार आहे. गडावर १२५ देशी फळांची आणि फुलांची झाडे लावण्यात येणार असल्याने शिवनेरी किल्ल्यावर जैन ठिबकवर देवराई फुलणार आहे.
शिवनेरीवरील प्रकल्प जुन्नरच्या सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या पुढाकाराने आणि पुरातत्त्व विभागाचे सहकार्याने राबवला जाणार आहे.

शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत किल्ल्यावरील जैवविविधता संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात येते; मात्र ऐन उन्हाळ्यातील चार महिने पाण्याची टंचाई जाणवू लागल्यानंतर झाडांना पाणी देणे अडचणीचे होते. ही अडचण दूर व्हावी यासाठी जुन्नरच्या सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या पुढाकाराने जैन उद्योग समूहाला शिवनेरी किल्ल्यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा देण्याबाबत मागणी केली होती. यावर जैन समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर जैन समूहाचे तांत्रिक अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहायक बी. बी. जंगले, वन परिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे आणि सह्याद्रीचे पदाधिकारी यांनी किल्ल्याची संयुक्त पाहणी करून अहवाल सादर केला. त्यानुसार अंबरखाना इमारतीच्या मागील वनक्षेत्रावर सुमारे २५ एकर क्षेत्रावर देशी वृक्षांची लागवड होेणार आहे.

गडावरील जैवविविधता संवर्धनासाठी पक्षी थांबे होण्यासाठी फळ असणार्‍या वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. यामध्ये गावरान बोरे, चिंच, आंबा, करवंद, फणस, जांभूळ आदी विविध प्रकारच्या सुमारे १२५ देशी फळ, फुलांची झाडे असणार आहे.

Protected Content